जर्मनीची आघाडीची लक्झरी वाहन उत्पादक Mercedes Benz नं भारतीय बाजारपेठेत आपली नवीन 'मेड-इन-इंडिया' S-Class कार लाँच केली. या सेडान कारचं उत्पादन पुण्यातील चाकण येथील कंपनीच्या प्लांटमध्ये करण्यात आलं असून ती पूर्णपणे भारतात तयार केली करण्यात आलेली कार आहे. आकर्षक लूक आणि दमदार इंजिन ही या कारची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
यापूर्वी कंपनी S-Class सेडानला कम्पलिट बिल्ट युनिट (CBU) रुटद्वारे भारतात आणत होती. यामुळेच या कारची किंमत अधिक होती. त्यावेळी या कारवर अधिक इम्पोर्ट ड्युटी लावण्यात आल्यानं या कारची किंमत 2.17 कोटी रूपये इतकी होती. परंतु आता भारतात या कारचं उत्पादन होत असल्यामुळे या कारची किंमत पूर्वीपेक्षा कमी झाली आहे. या कारची सध्या एक्स शोरूम इंडिया किंमत 1.57 कोटी रूपये इतकी आहे.
दरम्यान, भारतात एस क्लासच्या 8250 पेक्षा अधिक युनिट्सची विक्री केल्याचा दावा Mercedes Benz कडून करण्यात आला आहे. एस क्लासच्या सीबीयू युनिटला ग्राहकांची पसंती मिळाली होती. त्यामुळेच आता कंपनीनं या कारचं मेड इन इंडिया व्हर्जन लाँच केलं आहे. दरम्यान, या कारलाही आता उत्तम प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा कंपनीनं व्यक्त केली आहे.
दोन व्हेरिअंटमध्ये लाँच कंपनीनं नवी S-Class दोन व्हेरिअंटमध्ये सादर केली आहे. याच्या एन्ट्री लेव्हलच्या S 350d या व्हेरिअंटची किंमत 1.57 कोटी रूपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. तर याच्या S 450 4MATIC व्हेरिअंटची किंमत 1.62 कोटी रूपये आहे. कंपनी सध्या चाकण येथील प्रकल्पात एकूण 13 कार्सचं उत्पादन करत आहे.