मुळची ब्रिटनची असलेली ही कंपनी चीनच्या SIAC मोटर कार्पोरेशनने विकत घेतलेली आहे. एमजी काही महिन्यांपूर्वीच भारतात आली आहे. एका ग्राहकाने एमजी हेक्टर एसयुव्हीचे फोटो एका गाढवासोबत काढून ते सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. यावर कंपनीने ग्राहकाला कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मात्र, ब्रँडची बदनामी होतेय या भीतीने कंपनीने या ग्राहकाला मोठी ऑफर देऊ केली आहे.
साधारण 1920 सालची एक अशीच घटना आहे. राजस्थानातील अलवरच्या राजाने रोल्स रॉयस या आलिशान कारला कचरा गाडी बनविले होते. ब्रिटनमध्ये राजा जय सिंग हे रोल्स रॉयसच्या शोरुममध्ये राजेशाही पेहरावात गेले असता त्यांना तेथून घालवून देण्यात आले होते. यानंतर त्यांनी हॉटेलवर परत येत वेटरद्वारे या शोरूमला संपर्क साधला. यावेळी त्यांच्यासाठी शोरुमने रेड कार्पेट अंथरले होते. असाच काहीसा प्रकार या नव्या कंपनीच्या ग्राहकासोबत घडला आहे.
खरेतर राजस्थानमध्ये एका व्यक्तीने मोठ्या हौशेने ही एसयुव्ही घेतली होती. मात्र, कारच्या क्लचमध्ये समस्या निर्माण झाली जी सर्व्हिस सेंटरमध्ये सोडविली गेली नाही. तसेच त्याला अपमानजनक वागणूक देण्यात आली. यानंतर या कार मालकाने हेक्टरला गाढवाला बांधले आणि ओढायला लावले. त्याने एमजीच्या डिलरसमोरच हे कृत्य केले आणि व्हिडीओही काढला. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. अरुण पवार यांच्या यूट्यूब चॅनलवरून हा व्हिडीओ पोस्ट केला गेला. हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की कंपनीला याची दखल घ्यावीच लागली.
आधी कारवाईचा इशारा देणाऱ्या एमजीने अखेर नमते घेत ग्राहकाला कारचे सर्व पैसे परत करण्याची ऑफर दिली. एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष राजीव चाबा यांनी या ग्राहकाला पूर्ण पैसे परत करण्याचे किंवा कार रिप्लेस करण्याची ऑफर दिली आहे. याची माहिती त्यांनी ट्विट करून देत आम्ही त्याला ही ऑफर देऊ केली होती, मात्र त्याला आणखी काहीतरी हवे आहे. आता तुम्हीच सांगा आम्ही काय करावे, असे ट्विट होते.
एमजी मोटरच्या या कारला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. जूनमध्ये लाँचिंग होऊनही या कारला मोठी मागणी असल्याने कंपनीने आगाऊ बुकिंगच रद्द केले होते. आतापर्यंत या कंपनीने 13 हजार हेक्टर विकल्या आहेत.