एमजी कंपनीने व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट 2024 मध्ये आपला ईव्ही (EV) पोर्टफोलिओ प्रदर्शित केला आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये कॉमेट ईव्ही आणि जेडएस ईव्ही अशा दोन कारचा समावेश आहे. कॉमेट कमी रेंजची (230km- क्लेम्ड) ईव्ही आहे. या ईव्हीची किंमत 8 लाख रुपयांपासून सुरू होते. तर, झेडएस ईव्हीची रेंज (461km- क्लेम्ड) आहे आणि त्याची किंमत 22.88 लाख रुपयांपासून सुरू होते.
दरम्यान, टाटा मोटर्सनंतर, MG इलेक्ट्रिक कार बाजारात सर्वाधिक ईव्ही विकते. व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट 2024 मध्ये या ईव्हीचे प्रदर्शन करण्याबरोबरच एमजीने गुजरातमध्ये 7,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचीही माहिती दिली. एमजीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की "कंपनीने गुजरातमधील हलोल येथील प्लांटमधून 2,00,000 हून अधिक कारचे उत्पादन केले आहे. कंपनीचे स्थानिकीकरण वाढवणे, अधिक कौशल्य उपक्रम सुरू करणे आणि उत्पादन क्षमता वाढवणे हे उद्दिष्ट आहे."
एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि एमडी राजीव चाबा म्हणाले, "आम्हाला व्हायब्रंट गुजरात समिट 2024 चा भाग होताना आनंद होत आहे, जे राज्यासोबतच्या आमच्या मजबूत संबंधांची पुष्टी करते. गुजरातच्या व्यवसायासाठी अनुकूल वातावरण आणि आघाडीच्या धोरणांमुळे ते आमच्या गुंतवणुकीसाठी, विशेषत: इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EVs) एक आकर्षक ठिकाण बनले आहे. आमचा ईव्ही पोर्टफोलिओ आमच्या एकूण विक्रीत २५ टक्के योगदान देतो. सर्व गुजरातमधील आमच्या हलोल प्लांटमध्ये तयार केले जातात."