न्यूयॉर्क : जर्मनीची प्रसिद्ध लक्झरी कार कंपनी मर्सिडीजने तब्बल 7,44,000 कार माघारी बोलावल्या आहेत. यामध्ये डझनावर मॉडेल आहेत. अमेरिकेमध्ये 2001 ते 2011 या काळात विकल्या गेलेल्या या कार आहेत. सनरुफच्या ग्लास पॅनेलला समस्या आल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
या मोठ्या रिकॉलमध्ये सी क्लास, सीएलके क्लास, सीएलएस क्लास आणि ई क्लास मॉडेलही आहेत. ग्लास पॅनेल आणि स्लायडिंग फ्रेममध्ये समस्या आली आहे. यामुळे ग्लास उघडण्याला समस्या येत आहे, असे कंपनीने म्हटले आहे. कारच्या मालकांनी या दुरुस्तीसाठी याआधी पैसे मोजले असतील तर त्यांना ती रक्कम परत केली जाणार आहे. सध्या हा निर्णय केवळ अमेरिकेपुरताच असल्याचे मर्सिडिजच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
डिलर दुरुस्तीला आलेल्य़ा कारचे ग्लास पॅनेलची तपासणी करणार आहेत. जर यामध्ये दोष आढळला तर ते, स्लायडिंग सनरूफच बदलणार आहेत. गेल्या महिन्यातर मर्सिडिजला अमेरिकेने 20 दशलक्ष डॉलरचा दंड ठोठआवला होता. अमेरिकेच्या सरकारने काढलेल्या त्रुटीनंतरही वर्षभराचा कालावधी लोटला तरीही कंपनीने 1.4 दशलक्ष कार माघारी बोलावून दुरूस्त करून देण्यास टाळाटाळ केली होती. कंपनीने ग्राहकांना वेळेवर सुचित केले नसल्याचा आरोप अमेरिकेच्या महामार्ग सुरक्षा खात्याने ठेवला आहे. यावर 13 दशलक्ष तर अन्य एका प्रकरणात 7 दशलक्षांचा दंड ठोठावला आहे. यामध्ये अहवाल सरकारला सादर न करणे, रिकॉलची घोषणा न करणे आदी कारणे आहेत.