Mitsubishi Returning To India: तुमच्यापैकी अनेकांनी Pajero आणि Lancer या गाड्यांची नावे ऐकली असतील. आता या गाड्या क्वचितच रस्त्यावर दिसतात. याचे कारण म्हणजे, त्यांची निर्मिती करणारी कंपनी मित्सुबिशीने (Mitsubishi) केव्हाच भारतातील व्यवसाय बंद केला. मात्र, आता मित्सुबिशी भारतात कमबॅक करत आहे. मित्सुबिशीने TVS Mobility शी हातमिळवणी केली आहे. मित्सुबिशी कॉर्पोरेशन (MC), TVS मोबिलिटीमध्ये 300 कोटी रुपयांची गुंतवणूक करुन सुमारे 32 टक्के भागभांडवल खरेदी करेल.
TVS मोबिलिटीने जारी केलेल्या निवेदनानुसार, या गुंतवणुकीतून प्रवासी कार, व्यावसायिक वाहने आणि मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट्सच्या व्यवसायाला चालना देणे आहे. मित्सुबिशी TVS च्या सहकार्याने देशभरात आपले डीलरशिप नेटवर्क सुरू करणार आहे. या बिझनेस मॉडेलमध्ये पुढील तीन ते पाच वर्षांत दोन अब्ज डॉलर्सचा महसूल निर्माण करण्याची क्षमता असेल. विशेष म्हणजे, TVS Motors आधीपासून Honda Cars India ची भारतात डीलरशिप व्यवस्थापित करत आहे.
टीव्हीएस मोबिलिटीचे संचालक आर दिनेश म्हणाले, टीव्हीएस मोबिलिटीने आपल्या डीलरशिप व्यवसायाद्वारे भारतातील वाहनांच्या बाजारपेठेत विक्री, सेवा आणि वितरणामध्ये प्रमुख भूमिका बजावली आहे. मित्सुबिशी कॉर्पोरेशनच्या सहकार्याने हा व्यवसाय आणखी वाढण्यास मदत मिळेल. तर, मित्सुबिशी कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (ऑटोमोटिव्ह आणि मोबिलिटी ग्रुप) शिगेरू वाकाबायाशी म्हणाले की, त्यांची कंपनी वेगाने वाढणारी भारतीय बाजारपेठ काबीज करण्यासाठी TVS मोबिलिटी ग्रुपसोबत आपले संबंध वाढवत आहे.
विशेष म्हणजे, TVS मोबिलिटी आधीपासून भारतात होंडा कारच्या डीलरशिपचे व्यवस्थापन करत आहे. आता संपूर्ण देशात जपानी कार ब्रँड्सचे नेटवर्क विस्तारण्याकडे लक्ष केंद्रित आहे. नवीन कारच्या विक्रीत भारत जागतिक स्तरावर तिसरा असूनही, सुझुकी मोटर वगळता देशात जपानी वाहन कंपन्यांची उपस्थिती नगण्य आहे. या नवीन करारातून जपानी कारचे भारतात मार्केट वाढवण्यात भर दिला जाईल.
26 वर्षांपूर्वी भारतात एन्ट्रीसुमारे 26 वर्षांपूर्वी, 1998 मध्ये मित्सुबिशीने भारतीय कार कंपनी हिंदुस्तान मोटर्सच्या सहकार्याने भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला. हिंदुस्तान मोटर्स भारतामध्ये मित्सुबिशी कारचे उत्पादन आणि असेंबलिंगचे काम पाहायची. तेव्हा कंपनीने देशात अनेक कार लॉन्च केल्या, ज्यामध्ये पजेरो आणि लान्सर देशभर लोकप्रिय झाले. पण, नंतर कंपनीने भारतातील आपला व्यवसाय बंद केला. आता ही पुन्हा भारतीय बाजारपेठेत येत आहे.