नवी दिल्लीः राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोटार वाहन (संशोधन) विधेयक 2019ला (motor vehicles amendment bill 2019) या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मंजुरी दिली आहे. या नव्या विधेयकानुसार वाहतुकीचे नियम मोडणे तसेच ड्रायव्हिंग लायसन्स जारी करण्याच्या नियमांत मोठे बदल करण्यात आले आहेत. संसदेनं या विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर राष्ट्रपतींनीही यावर शिक्कामोर्तब केलं आहे. आता वाहतुकीचे नियम मोडल्यास कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली असून, 1 सप्टेंबरपासून हे नियम लागू होणार आहेत.अल्पवयीन मुलानं गाडी चालवून अपघात केल्यास त्याच्या पालकांना 3 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. तसेच त्या वाहनाची नोंदणीही रद्द केली जाणार आहे. दंडाच्या रकमेतही भरमसाट वाढ करण्यात आली आहे. नव्या नियमानुसार, आपत्कालीन वाहनांना रस्ता करून न देणे आणि गाडी तंदुरुस्त नसल्यावरही चालवल्यास 10 हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांकडून 1 लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. भरधाव वेगानं गाडी चालवणाऱ्यांवर 1 हजार ते 2 हजारांपर्यंत दंड बसू शकतो.
मोटार वाहन (संशोधन) विधेयकातील 19 महत्त्वाचे नियम(1) कलम 178अंतर्गत तिकिटाशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 500 रुपयांचा दंड आकारला जाणार(2) कलम 179 अंतर्गत प्रशासनाच्या आदेशाचं पालन न केल्यास 2 हजार रुपयांचा दंड होणार (3) कलम 181अंतर्गत लायसन्सशिवाय गाडी चालवणाऱ्याला 5000 रुपयांपर्यंत दंड ठोठावणार(4) कलम 182 नुसार वाहन तंदुरुस्त नसतानाही चालवण्यास 10,000 रुपये दंड होणार(5) कलम 183 अंतर्गत घालून दिलेल्या वेगाच्या मर्यादेपेक्षा जास्त गतीनं गाडी दामटल्यास LMV 1000 रुपये, MPV 2000 रुपये दंड ठोठावणार(6) कलम 184 अंतर्गत खतरनाक पद्धतीनं वाहन चालवल्यास 5000 रुपयांपर्यंत दंड होणार(7) कलम 185 नुसार दारू पिऊन गाडी चालवल्यास 10,000 रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे.(8) कलम 189अंतर्गत आता स्पीडिंग/रेसिंगवर 5000 रुपये दंडाची तरतूद (9) कलम 1921 A अंतर्गत परमिट नसेलेल वाहन चालवल्यास 10 हजार रुपयांचा दंड(10) कलम 193 अंतर्गत लायसन्सच्या नियमांचा भंग केल्यास 25,000 ते 1 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद(11) कलम 194नुसार ओव्हरलोडिंगवर 2000 रुपये आणि प्रति टन 1000 रुपये अतिरिक्त 20,000 रुपये आणि प्रति टन 2000 रुपये अतिरिक्त दंडाची तरतूद(12) कलम 194 A अंतर्गत क्षमतेहून जास्त प्रवासी नेल्यास 1000 रुपये प्रति प्रवाशावर अतिरिक्त दंड(13) कलम 194 B अंतर्गत आता सीट बेल्ट न घातल्यास 1 हजार रुपयांचा दंड आकारणार(14) कलम 194 C अंतर्गत स्कूटर आणि बाइकवर ओव्हरलोडिंग म्हणजेच दोनहून अधिक जण असल्यास 2 हजार रुपयांचा दंड आणि 3 महिने लायसन्स होणार रद्द(15) कलम 194 D अंतर्गत हेल्मेटशिवाय प्रवास केल्यास 1000 रुपयांपर्यंत दंड, 3 महिन्यांसाठी लायसन्स रद्द (16) कलम 194 E अंतर्गत आता अँब्युलन्ससारख्या आपत्कालीन वाहनांना रस्ता न दिल्यास 10 हजार रुपयांपर्यंत दंड होणार (17) कलम 196 अंतर्गत आता वाहनाचं विमा संरक्षण नसल्यास वाहन चालवणाऱ्याकडून 2 हजारांचा दंड वसूल करणार(18) कलम 199अंतर्गत अल्पवयीन मुलानं अपघात केल्यास त्याला व गाडीच्या मालकाला दोषी ठरवलं जाणार आहे. 3 वर्षांच्या शिक्षेची तरतूद, अल्पवयीनावर ज्युवेलाइन अॅक्टंतर्गत कारवाई होणार, तसेच वाहनाचं रजिस्ट्रेशन रद्द होणार (19) अधिकाऱ्यांना मिळालेल्या अधिकारानुसार त्यांना कलम 183, 184, 185, 189, 190, 194C, 194D, 194E अंतर्गत ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करता येणार