मोटारसायकलमध्ये इंधन कमी, म्हणून ट्रॅफिक पोलिसांनी फाडली २५० रुपयांची पावती; काय आहे नियम?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 11:32 AM2022-07-29T11:32:58+5:302022-07-29T13:47:00+5:30
Traffic Police Rule on Low Fuel Fact Check: केरळमध्ये ट्रॅफिक पोलिसांनी एका तरुणाला त्याच्या बुलेटमध्ये कमी इंधन होते म्हणून २५० रुपयांची पावती फाडल्याचा प्रकार घडला आहे.
दिल्ली पोलिसांनी कार चालविणाऱ्या चालकाला हेल्मेट न घातल्याने फाईन मारल्याचा प्रकार काही काळापूर्वी घडला होता. आता केरळमध्ये ट्रॅफिक पोलिसांनी एका तरुणाला त्याच्या बुलेटमध्ये कमी इंधन होते म्हणून २५० रुपयांची पावती फाडल्याचा प्रकार घडला आहे.
हा तरुण ऑफिसला जात असताना त्याला वळसा घालून जायचे नव्हते. त्यामुळे त्यांने राँग साईडने बुलेट नेली. पाच सहा मीटर जात नाही तोच समोर पोलीस होते. त्यांनी गाडी थांबवून त्याच्याकडे पावती सोपविली. त्याच्याकडे तेव्हा पैसे नसल्याने त्याने नंतर भरतो असे सांगून थेट ऑफिस गाठले.
ऑफिसमध्ये जाऊन या तरुणाने जेव्हा पावती पाहिली तेव्हा त्याला त्याच्या गाडीत इंधन कमी होते म्हणून दंड केल्याचे कारण दिसले. यावरून त्याला काहीतरी चुकल्याचे समजले. त्याने या पावतीचा फोटो सोशल मीडियावर टाकला. तो व्हायरल झाला. परंतू तेव्हा त्याने विरुद्ध दिशेने गाडी चालविताना पकडल्याचे सांगितले नव्हते. यामुळे असाही काही नियम असतो का, असा गैरसमज देशभरातील लोकांचा झाला. त्याने काही वकिलांना देखील ही पावती पाठविली होती, त्यांनी असा कोणताही नियम नसल्याचे सांगितले होते.
परंतू आता या तरुणाने म्हणजेच बसील शाम याने खरी पावती कोणत्या नियमासाठी फाडली होती, त्याचे कारण सांगितले आहे. वाहतूक पोलिसांनी चुकीच्या पावत्या फाडल्याचे प्रकार या पूर्वीही घडले आहेत. अनेकदा तर नंबर नीट वाचता न आल्याने नियम मोडणाऱ्याला सोडून दुसऱ्यालाच ऑनलाईन चलान पाठविण्यात आल्याचे प्रकारही घडले आहेत. अनेकदा तर मोटरसायकल वाला नियम मोडतो आणि त्याची पावती कारवाल्याला गेल्याचेही समोर आले आहे.
खरा नियम काय?
कमी इंधन असल्यास दंडाची पावती फाडण्याचा नियम आहे. परंतू तो फक्त व्यावसायिक वाहनांना लागू आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठीही हा नियम आहे. खासगी वाहनांना नाही.