चीनची मोठी वाहन निर्माता कंपनी बिल्ड युअर ड्रीम (BYD)ने इलेक्ट्रिक सेदान कार BYD Seal प्रदर्शित केली. चौथ्या तिमाहीमध्ये ही कार लाँच होणार आहे. याचबरोबर या कारची डिलिव्हरी देखील याच आसपास सुरु होईल.
सील ही कार ओकेन एक्स कंसेप्टवर बनविण्यात आली आहे. बीवायडीची ही भारतातील तिसरी इलेक्ट्रीक कार असणार आहे. या सेदान कारची लांबी 4.80 मीटर, रुंदी 1.87 मीटर, उंची 1.46 मीटर आणि तिचा व्हीलबेस 2.92 मीटर आहे. आकाराने मोठी असल्याने, कारमध्ये मोठी केबिन आणि जागाही मिळते.
Atto 3 SUV आणि e6 MPV प्रमाणे, BYD सीलला मध्यवर्ती कन्सोलमध्ये फिरणारा, 15.6-इंचाचा इन्फोटेनमेंट डिस्प्ले मिळतो. ड्रायव्हरसाठी 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि हेड-अप डिस्प्ले आहे. बाहेरील बाजूस, स्पोर्टी अलॉय व्हील्स, स्मार्ट डोअर हँडल्स कारचे साइड प्रोफाइल वाढवतात. कारच्या पुढील भागाला हवा आत घेण्यासाठी मोठी जागा, बूमरँग-आकाराचे एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स मिळतात.
कंपनीने ही इलेक्ट्रिक कार दोन वेगवेगळ्या बॅटरी पॅकसह सादर केली आहे. यामध्ये 61.4 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक आणि 82.5 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. पहिली बॅटरी एका चार्जमध्ये 550 किलोमीटर आणि दुसरी बॅटरी 700 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. याशिवाय, हे वाहन 3.8 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तासाचा वेग पकडण्यास सक्षम आहे.