शहर असो वा ग्रामीण भाग दुचाकी (two wheeler) ही आज गरज बनली आहे. एकेकाळी सायकलवरून जाणारा ग्रामीण भागातील सामान्य माणूसही आज मोटारसायकल (motorbike) किंवा स्कूटर (scooter) वरून फिरू लागला आहे. ही त्याची चैन नव्हे तर गरज आहे. ग्रामीण भागात ही स्थिती तर मग शहरात तर ती जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. पुण्यात तर प्रत्येकाच्या घरात किमान २ स्कूटर्स वा मोटारसायकल असतातच कारण तेच त्यांचे दळणवळणाचे साधन झाले आहे. मुंबईमध्ये लोकलने प्रवास करण्यापेक्षा अनेकजण मोटारसायल किंवा स्कूटर्सला प्राधान्य देत आहेत. दुचाकींच्या उत्पादकांच्या खपाकडे नजर जरी टाकली तरी दुचाकीला आलेले दैनंदिन जीवनातील महत्त्व लक्षात येईल. याशिवाय जास्त ताकदीच्या मोटारसायकलींचे तरुण पिढीला मोठे आकर्षण आहे, जास्त सीसी क्षमता असणाऱ्या मोटारसायकलींचे रूपही इतके पालटले आहे, त्यात वैविध्यताही आली आहे. तरुण पिढीचे आकर्षण लक्षात घेऊन मोटारसायकलींचे उत्पादनही वाढते आहे. गर्दीच्या व वर्दळीच्या रस्त्यावरही सहजपणे मार्ग काढून पुढे जाता येते यामुळे दुचाकींच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. दुचाकीचे हे महत्त्व आता दुर्लक्षिण्यासारखे राहिले नाही. त्यात महिला वर्गांसाठी काही काळापूर्वी सुरू केलेल्या ऑटोगीयरच्या स्कूटर्स व स्कुटींनीही बाजार वधारलेला आहे. महिलां दुचाकीधारकांची संख्या पुण्याप्रमाणेच मुंबईमध्ये वाढत आहे. याशिवाय देशातील विविध शहर व ग्रामीण भागातही महिलांनी स्कूटर्स वापरण्याचे प्रमाण वाढलेले आहे. काही वर्षांपूर्वी गीयरच्या स्कूटर्सनेच सारा बाजार व्यापला होता, पण ऑटोगीयर्सच्या स्कूटरेटने त्या गीयरच्या स्कूटर्सना इतके मागे टाकले की त्यांचे उत्पादनही आता बंद केले गेले आहे. काळाप्रमाणे स्कूटर्स बदलल्या खऱ्या पण दहा - बारा वर्षांपूर्वी या स्कूटर्सपेक्षा मोटारसायकलींना मागणी जास्त होती. परंतु महिलांचाही स्कूटर्सचा वापर वाढला. केवळ तरुण महिलांच नव्हेत तर प्रौढ महिला, महाविद्यालयीन विद्यार्थिनी, गृहिणी, व्यावसायिक महिलांनीही स्कूटर्सना दाद दिली, त्यांना चालवायला सोप्या असणाऱ्या आजकालच्या स्कूटर्सना मायलेज कमी असूनही त्याकडे कोणी फारसे मनावर घेत असल्याचे दिसत नाही. दुचाकींच्या मायलेजचा आता साऱ्यांनाच विसर पडला आहे, किंबहुना दुचाकींची ही गरज आहे, चैन नाही, रुबाब नाही.
मोटारसायकली १०० ते १२५ सीसी क्षमतेचे इंजिन तर ११० ते १२५ सीसीचे स्कूटर्सचे इंजिन सर्वसाधारणपणे दिसून येते. जास्तीत जास्त वापर हा सर्वसामान्यांकडून होतो. त्यावरच्या क्षमतेच्या स्कूटर्स बाजारात नसल्या तरी मोटारसायकलींच्या जबरदस्त ताकदीच्या म्हणजे १५० सीसीच नव्हेत तर अगदी ८०० सीसी ताकदीपर्यंतच्या मोटारसायकलीही तरुणाईचे आकर्षण बनल्या आहेत. त्यांची संख्या कमी नाही. मुंबई व पुण्यासारख्या शहरांमध्ये इतकी वाहतूककोंडी होत असली तरी त्यावरचा हा उपाय म्हणून दुचाकीचा उपाय आहे.