मारुती सुझुकीने 2022 मध्ये बलेनो आणि ब्रेझा सारख्या कार नव्या अवतारात लॉन्च केल्या आहेत. मात्र, मारुती सुझुकी स्विफ्टचे चाहते अद्यापही मोठ्या अपडेटची वाट पाहत आहेत. स्विफ्ट सर्वप्रथम 2005 मध्ये लाँच करण्यात आली होती. यानंतर तिला अनेक वेळ अपडेट करण्यात आले. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कंपनीने या कारमध्ये म्हणावे तसे मोठे अपडेट केलेले नाहीत. या वर्षात मारुती सुझुकी स्विफ्टला नव्या अवतारात लॉन्च करू शकते. नव्या स्विफ्टचे डिझाइन, इंजिन आणि मायलेजसारखे काही तपशीलही समोर आले आहेत. ही कार मे महिन्यापर्यंत जागतिक बाजारपेठेत आणली जाऊ शकते.
असे असेल डिझाइन -माध्यमांतील वृत्तांनुसार, या नव्या सुझुकी स्विफ्टमध्ये स्टायलिश एक्सटीरिअर, गोलाकार कडा आणि आक्रामक लाइन्स मिळतील. केबिनमध्ये क्वालिटी, फिट अँड फिनिश आणि हाय-एंड फीचर्सच्या बाबतीतही मोठे बदल होतील. वृत्तांनुसार, या नव्या मॉडेलमध्ये लांब व्हीलबेस देण्यात येईल. यामुळे दुसऱ्या रांगेतील सीट आणि बूटमधील जागा अधिक चांगली केली जाऊ शकेल. लीक झालेल्या फोटोंवरून, नवी स्विफ्ट सध्याच्या मॉडेलच्यातुलनेत अधिक रुंद असेल. हिला नवे फ्रंट ग्रिल आणि नवे हेडलॅम्प्स दिले जातील. फ्रंट बम्परमध्ये रुंद एअर इंटेक्स असतील. याशिवाय या कारमध्ये नव्या बॉडी पॅनलसह डुअल-टोन अलॉय व्हीलही असेल.
इंजिन आणि मायलेज -माध्यमांतील वृत्तांमध्ये दावा करण्यात आला आहे, की नव्या Suzuki Swift मध्ये स्ट्राँग हायब्रिड पॉवरट्रेन दिला जाईल. तो टोयोटापासून घेतला जाईल. यात 1.2-लिटर डुअलजेट पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. या टेक्नॉलॉजीसह नवी स्विफ्ट 35-40 किमी प्रति लिटर एवढे मायलेज ऑफर करू शकते. हे इंजिन 89bhp आणि 113Nm जनरेट करू शकते. एवढेच नाही तर या कारमध्ये मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्सेस ऑफर केले जाऊ शकतात.