नवी दिल्ली : मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) नुकतीच नवीन जनरेशनची स्विफ्ट लाँच केली आहे. या हॅचबॅकला नवीन झेड-सीरीजचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. याशिवाय, कार अधिक स्टायलिश आणि नवीन फीचर्ससह येते. या कारची सेफ्टी फिचर्स देखील अपडेट करण्यात आली आहेत. तसेच, आता कारच्या बेस मॉडेलमध्ये 6 एअरबॅग देखील देण्यात आल्या आहेत.
नवीन मारुती स्विफ्टच्या लाइनअपमध्ये सीएनजी व्हेरिएंट देखील जोडले जाणार आहेत. मारुती सुझुकीच्या इतर गाड्यांप्रमाणे, नवीन स्विफ्ट देखील फॅक्टरी-फिट सीएनजी किटसह लाँच करण्यात येणार आहे. हे किट कारच्या बूट स्पेसमध्ये बसवले जाईल. या सेटअपमुळे, सीएनजी मॉडेल नियमित मॉडेलच्या तुलनेत कमी पॉवर आणि टॉर्क जनरेट करेल.
नवीन स्विफ्टमध्ये 1.2 लिटर, 3-सिलिंडर इंजिन आहे. हे मॅन्युअल ट्रान्समिशनसह 24.80 किमी प्रति लिटर मायलेज देते. तर ऑटोमॅटिक मॉडेल 25.75 kmpl चा मायलेज देते. जुन्या स्विफ्ट मॉडेलबद्दल बोलायचे झाले तर, त्याचे मॅन्युअल मॉडेल 22.38 kmpl चे मायलेज देते आणि ऑटोमॅटिक मॉडेल 22.56 kmpl चे मायलेज देते. स्विफ्टच्या जुन्या K-सिरीज, 4-सिलिंडर इंजिनच्या तुलनेत नवीन 3-सिलिंडर इंजिन 8bhp कमी पॉवर आणि 1Nm टॉर्क कमी जनरेट करते.
नवीन मारुती सुझुकी स्विफ्टची किंमत 6.49 लाख ते 9.50 लाख रुपये आहे, ही किंमत एक्स-शोरूमनुसार आहे. कारच्या सीएनजी मॉडेलची किंमत सध्याच्या मॉडेलपेक्षा जवळपास 90,000 रुपयांनी जास्त असण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सुझुकी जपान छोट्या कारसाठी नवीन स्ट्राँग हायब्रिड सिस्टमवर काम करत आहे. कंपनी स्विफ्टच्या नेक्स्ट जनरेशन मॉडेलमध्ये नवीन HEV टेक्नॉलॉजीचा वापरणार आहे. सर्वात आधी ही टेक्नॉलॉजी मारुती सुझुकी फ्रॉन्क्सच्या फेसलिफ्ट मॉडेलमध्ये वापरले जाईल. या कारची विक्री 2025 मध्ये सुरू होऊ शकते. मारुतीच्या HEV हायब्रिड टेक्नॉलॉजीमध्ये नवीन झेड-सिरीज इंजिन दिले जाईल, जे 1.5kWh ते 2kWh बॅटरी पॅक आणि इलेक्ट्रिक मोटरसह येईल.