केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कार, मोटारसायकल, स्कूटर किंवा इतर कोणत्याही प्रकारचे वाहन चालवणाऱ्यांसंदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी नुकतेच सांगितले की, भारतात दरवर्षी 5 लाख रस्ते अपघात होतात, हे प्रमाण जगातील सर्वाधिक अपघातांपैकी एक आहे.
या अपघातांमध्ये सुमारे 1.5 लाख लोकांचा मृत्यू होतो, तर जवळपास 3 लाख लोक गंभीर जखमी होतात. गडकरी म्हणाले, दुर्देवाची गोष्ट म्हणजे 70 टक्के मृत्यू हे 18 ते 45 वयोगटातील लोकांचे होतात. रस्ते सुरक्षा ही आमच्या सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे.
गडकरी म्हणाले, अपघातांची शक्यता कमी करण्याच्या दृष्टीने ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमसोबतच AI-आधारित तंत्रज्ञानाचीही आवश्यकता आहे. तसेच, रस्ते सुरक्षा हा जगभरात चिंतेचा विषय असून भारतासारख्या विकसनशील देशांसाठीही हे एक आव्हान आहे. या रस्ते अपघातांच्या फॉरेन्सिक तपासणीसाठी एआय-आधारित ड्रोन आणि रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो, असेही गडकरी यांनी म्हटले आहे.
गडकरींच्या मते, मागणी आणि पुरवठा यांच्यातील असंतुलनामुळे वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण होतो. अशा परिस्थितीत एआय आधारित साधनांच्या मदतीने रहदारीच्या स्थितीची अचूक तपासणी, विश्लेषण आणि तिचा अंदाज लावला जाऊ शकतो. याशिवाय, भारतीय महामार्गांवर एक प्रगत अशी वाहतूक व्यवस्था प्रणाली तयार करण्यात आली आहे. यात इलेक्ट्रॉनिक सेन्सर्स आणि एचडी कॅमेऱ्यांच्या मदतीने डेटा संकलित केला जातो, असेही गडकरी म्हणाले.