नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी अमेरिकन इलेक्ट्रीक कार कंपनी टेस्ला (Tesla) चे चांगलेच कान पिळले आहेत. टेस्लाला भारतात आपल्या कार निर्माण करण्यास अनेकदा सांगितले आहे. सरकारकडून हवी ती मदत करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. मात्र, अद्याप त्यांनी इलेक्ट्रीक कारचे उत्पादन सुरु केलेले नाही, अशा शब्दांत गडकरींनी नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे त्यांनी टाटा मोटर्सची (Tata Electric car) स्तुती केली आहे.
टेस्लाचे मालक एलन मस्क (Elon Musk) यांनी दोन महिन्यांपूर्वी भारतात सर्वाधिक इंपोर्ट ड्यूटी लावली जात असल्याचे म्हटले होते. तसेच ती कमी करावी असेही म्हटले होते. मस्क यांच्या या विधानावर गडकरी यांनी निशाना साधला आहे. गडकरी यांनी एका मीडिया एन्क्लेव्हला संबोधित केले. यावेळी त्यांनी टेस्लाला कडक शब्दांत बजावले. टेस्लाने चीनमध्ये बनविलेल्या इलेक्ट्रीक कार भारतात विकू नयेत. टेस्लाने भारतात इलेक्ट्रीक कारचे उत्पादन करायला हवे. एवढेच नाही तर त्यांनी त्यांच्या कारची बाहेरच्या देशांना निर्यातही करावी.
नितीन गडकरींनी स्वदेशी कंपनी टाटाची स्तुती केली. टाटा मोटर्सच्या कार या काही टेस्लाच्या कारपेक्षा कमी नाहीत. चांगल्या कार आहेत, असेही गडकरी म्हणाले. टेस्लाला जी काही मदत लागेल ती सरकार देईल. कंपनीच्या कराच्या बाबतीतील तक्रारीवर देखील टेस्लाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरु आहे, असेही त्यांनी सांगितले.
गाड्यांच्या स्पीड लिमिटवर काय म्हणाले गडकरी - गडकरी म्हणाले, भारतातील वाहनांच्या वेग मर्यादेचे मापदंड, हे आमच्यासाठी एक मोठे आव्हान आहे. कारच्या वेगासंदर्भात सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे काही निर्णय आहेत, यामुळे आम्ही काहीही करू शकत नाही. आज देशात असे एक्सप्रेस वे तयार झाले आहेत, ज्यांवर कुत्राही येऊ शकत नाही. कारण रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. यामुळे, आता आम्ही प्लॅन केला आहे की, संसदेत गेलो की विधेयक बनवून सर्व मापदंड बदलून टाकायचे. ते म्हणाले, कारच्या गतीसंदर्भात, गती वाढली की अपघात होईल, अशी एक मानसिकता तयार झाली आहे. या मानसिकतेतून बाहेर पडायचे आहे. यासाठी आम्ही फाईल तयार करत आहोत. यात, एक्स्प्रेस वेपासून महामार्ग, शहरे आणि जिल्ह्यांच्या रस्त्यांपर्यंत गती मर्यादा तयार केली जात आहे. लोकशाहीत आपल्याला कायदे करण्याचा अधिकार आहे आणि न्यायाधीशांना निर्णय देण्याचा अधिकार आहे, असेही गडकरी म्हणाले.