नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कार आणि टेक्नॉलॉजीमध्ये खूप आवड आहे. ते अनेकदा कारशी संबंधित कार्यक्रमांमध्ये उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच, देशात इलेक्ट्रिक कारला प्रोत्साहन देण्याबाबत ते सतत बोलत असतात. याशिवाय जैव इंधनावर चालणाऱ्या गाड्यांवरही ते भर देत आहेत. दरम्यान, नितीन गडकरी स्वतः कोणत्या गाडीतून प्रवास करतात हे अनेकांना जाणून घ्यायचे असेल तर त्यांच्या गॅरेजमध्ये कदाचित मर्सिडीज किंवा स्कॉर्पिओ सारख्या गाड्या असतील, पण त्यांना टोयोटाची कार जास्त आवडते.
नितीन गडकरी टोयोटा मिराई (Toyota Mirai) सेडानचा वापर करतात. एकदा ते या कारमधून संसदेत येतानाही दिसले आहेत. विशेष म्हणजे ही हायड्रोजनवर चालणारी कार आहे. टोयोटाने गेल्या वर्षी ही डेमो कार म्हणून सादर केली असून नितीन गडकरी यांच्याकडे ही कार चाचणी स्वरूपात आहे.
2 रुपये प्रति किमी खर्चआपण इंधनात आत्मनिर्भर व्हायला हवे. त्यामुळे हायड्रोजन कारवर भर दिला जात आहे, असे नितीन गडकरी यांचे म्हणणे आहे. तसेच, नितीन गडकरींनी सांगितले की, इलेक्ट्रिक कारचा खर्च प्रति किमी 1 रुपये आहे. तर या हायड्रोजन कारचा खर्च 1.5 ते 2 रुपये प्रति किमी आहे. ते म्हणाले, "सध्या आम्ही 8 लाख कोटी रुपयांचे कच्चे तेल आयात करतो. जर आम्हाला आत्मनिर्भर देश बनायचे असेल, तर आम्हाला भारतात हायड्रोजनवर आधारित इंधनाचे उत्पादन करणे आवश्यक आहे."
काय आहेत कारचे फीचर्स?टोयोटा मिराई हायड्रोजन इंधन सेल टेक्नॉलॉजीवर काम करते. त्यात हायड्रोजन टाकी आहे, ज्याचा गॅस ऑक्सिजनसह रिएक्शन करून वाहनाला गती मिळते. यामध्ये एक इलेक्ट्रिक मोटर देखील आहे, जी 182 PS पॉवर आणि 406 Nm टॉर्क जनरेट करते. यात 1.24 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक आहे. यात 5.2 किलोग्रॅम क्षमतेची हायड्रोजन टाकी आहे. टाकी भरली की ही कार 646 किलोमीटरपर्यंत धावू शकते.