टाटा समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री आणि शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सीट बेल्टबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्याचे आदेश उद्या परवापर्यंत येतीलच. परंतू, याचबरोबर गडकरींनी अॅमेझॉनला सीट बेल्ट अलार्म ब्लॉकरची विक्री बंद करण्याचे आदेश दिले होते. अॅमेझॉनने भारतात हा आदेश पाळलाच परंतू अमेरिका आणि ब्रिटनमध्ये देखील याची अंमलबजावणी केली आहे.
जगभरात व्यवसाय करत असलेली ई कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने शुक्रवारी युएस आणि युकेमध्ये आपल्या प्लॅटफॉर्मवरून सीट बेल्ट अलार्म सिस्टिम बंद करणारे सीट बेल्ट सॉकेट पीनची विक्री बंद केली आहे. भारतात ही विक्री बंद केल्यावर कंपनीने तिथेही ती लागू केली आहे.
या आधीही भारतात सीटबेल्ट न लावल्यामुळे अनेक भीषण अपघात झाले आहेत. पण, आता मिस्त्री यांच्या अपघातानंतर सीट बेल्टची गरज आणि महत्त्व यावर बरीच चर्चा होत आहे. रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत नितीन गडकरी म्हणाले की, बरेच लोक अॅमेझॉनवरून क्लिप खरेदी करतात, ज्याचा वापर सीट बेल्ट अलार्म ब्लॉक करण्यासाठी केला जातो. या उत्पादनाची विक्री थांबवण्यासाठी अॅमेझॉनला नोटीस पाठवली आहे. NCRB 2021 च्या अहवालानुसार, भारतात रस्ते अपघातांमुळे 1,55,622 मृत्यू झाले आहेत आणि त्यापैकी 69,240 अपघात हे दुचाकी वाहनांमुळे झाले आहेत.
असे अपघात नेहमीचेच पण या दोघांनी लक्ष वेधले...विनायक मेटे आणि सायरस मिस्त्री यांचा दणकट गाड्या असूनही अपघाती मृत्यू झाला होता. कारण ते मागच्या सीटवर बसले होते आणि सीटबेल्ट न बांधल्याने त्यांचे डोके आदळून त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता. तसे पाहता असे अपघात नेहमीच होत असतात, परंतू या दोन्ही व्यक्ती राजकीय दृष्ट्या आणि औद्योगिक दृष्ट्या महत्वाच्या असल्याने याकडे सर्वांचे लक्ष गेले आहे. मागच्या सीटवर बसणाऱ्यांना सीट बेल्ट लावणे आवश्यक आहे. मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशाने सीट बेल्ट लावला नाही तर दंडाची पावती फाडली जाईल, असा इशारा गडकरींनी दिला आहे.