लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशात टोलवसुलीसाठी फास्टॅगला नवीन पर्याय लवकरच येणार आहे. वाहनाच्या नंबर प्लेटवरून सॅटेलाइटवर आधारित टोलवसुलीची प्रक्रिया देशात सुरू करण्याची तयारी सुरू आहे. यामध्ये चालत्या वाहनांकडून सॅटेलाइटद्वारे टोल वसुली केली जाणार असून, त्यासाठी फास्टॅगची गरज भासणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली आहे.
राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासामध्ये नितीन गडकरी यांनी माहिती देताना सांगितले की, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून टोलवसुलीत सुधारणा करण्यास पूर्ण वाव आहे. यातून ना कोणी टोल चोरू शकतो ना कोणाला वाचवता येणार आहे. आतापर्यंत टोल न भरल्यास शिक्षेची तरतूद नाही.
कधी सुरू होणार? हे नवे तंत्रज्ञान लागू करण्यासाठी संसदेत विधेयक आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे गडकरी म्हणाले. त्यानंतर सहा महिन्यांत ही प्रणाली देशात लागू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. यामुळे टोल नाका बनविण्याची गरज नसून, टोल दिल्याशिवाय प्रवास करणे अशक्य आहे. यातून जे पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना शिक्षा होईल, असे गडकरी म्हणाले.
वाहनांची ओळख कशी पटणार?गडकरी म्हणाले की वाहन उत्पादकांना वाहनांमध्ये जीपीआरएस सुविधा देण्यास सांगितले आहे. त्यामुळे टोल वसुली सुलभ होईल आणि लोकांनाही दिलासा मिळेल.
फायदा नेमका कुणाला मिळणार? सध्या एखादी व्यक्ती १० किमीचा टोल रस्ता वापरते, परंतु त्याला ७५ किमीसाठी टोल भरावा लागतो, परंतु जीपीआरएस आधारित टोल वसुलीप्रक्रिया सुरू झाल्यावर जेथून वाहन टोलमध्ये प्रवेश करेल आणि जेव्हा ते बाहेर पडेल तेव्हापर्यंतचा टोल आकारला जाईल. यामुळे टोलीही बचत होणार आहे.
भारत अमेरिकेलाही टाकणार मागेदेशात २६ ग्रीन एक्स्प्रेस हायवे बांधण्याचे काम जोरात सुरू आहे. २०२४पर्यंत देशातील हे २६ ग्रीन एक्स्प्रेस हायवे सुरू झाल्यानंतर भारत रस्त्यांच्या बाबतीत अमेरिकेच्या पुढे जाईल, असे गडकरी म्हणाले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे कोणतीही आर्थिक टंचाई नसल्याचे ते म्हणाले.
फास्टॅग असतानाही रोखीने टोलदेशात वाहनांमध्ये टोलवसुली करण्यासाठी फास्टॅग बसवूनही वसुली पूर्ण होत नसल्याचेही गडकरी म्हणाले. सध्या त्यातून दररोज १२० कोटी रुपये वसूल केले जात आहेत. ९७ टक्के लोक हा फास्टॅगचा वापर करत आहेत. मात्र फक्त ६७ टक्के लोकच याद्वारे टोल भरतात. बाकीचे लोक दुप्पट टोल रोख रक्कम देत भरत आहेत.