नवी दिल्ली : नवरात्रीपासून देशभरातीत सर्वच बाजारात खरेदीचा जोर वाढला आहे. यंदा बाइकसोबत कार खरेदी वेगाने सुरू आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशनच्या (फाडा) अंदाजानुसार या दिवाळीच्या हंगामात देशभरात ४५ लाखाहून अधिक गाड्यांची विक्री होऊ शकते. यात इव्हींचाही समावेश आहे. या हंगामात डीलरांकडे गाडी खरेदीसाठी होणाऱ्या चौकशीचे प्रमाण तिप्पट वाढले आहे.
मागच्या वर्षी २०२३ मध्ये दिवाळीत ३७.९३ लाखांची विक्री झाली होती. तर २०२२ च्या दिवाळीत ३२ लाख वाहने विकली गेली. ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी कंपन्यांही आकर्षक सवलती देत आहेत. फाडाचे उपाध्यक्ष साई गिरधर म्हणाले की, गाड्यांची विक्रमी विक्री होण्यामागे अनेक कारणे आहेत. डीलर्सकडे सर्व कंपन्यांची सर्व मॉडेल्स मुबलक संख्येने उपलब्ध आहेत. यंदा गाड्यांसाठी ग्राहकांना वेटिंग करावे लागणार नाही. २०२३ मध्ये वेटिंग पिरिएड अधिक होता, तसेच ग्राहकांच्या पसंतीची मॉडेल्सही उपलब्ध नव्हती.
नवरात्रीच्या १० दिवसांत ट्रॅक्टर वगळता सर्व गाड्यांच्या विक्रीत वाढ झाली आहे. बाइकची विक्री १२ टक्क्यांनी वाढली आहे. सामान्यपणे दिवाळीच्या हंगामात २० टक्के वाहनांची विक्री नवरात्रीच्या दिवसात होत असते. फाडाचे उपाध्यक्ष साई गिरधर यांनी सांगितले की, या हंगामात ग्रामीण भागात बाइक विक्रीचे प्रमाण वाढले आहे. मे-जूनमध्ये गरमीचे प्रमाण अधिक होते तर नंतर पाऊसही मोठ्या प्रमाणात पडला. ही कारणे तसेच श्राद्ध आदी कारणांमुळे ग्राहकांनी खरेदी करणे टाळले होते. परंतु आता गाड्यांची चौकशी आणि विक्री दोन्हीमध्ये वाढ झाली आहे.
काय ऑफर्स?- मारुतीने आपल्या विविध मॉडेल्सवर ४० ते ७० हजारापर्यंत सूट दिली. - टाटा मोटर्सने विविध आकर्षक सूट तसेच एक्स्चेंज बोनस दिला आहे.- होंडाने तीन वर्षांच्या मोफत मेंटेनन्सचे पॅकेज दिले आहे.