नवी दिल्ली : भारतात सर्वाधिक यशस्वी झालेले फियाटचे डीडीएसआय इंजिन आता हळूहळू बंद होण्याच्या मार्गावर आहे. कारण मारुती आपल्या कारमध्ये स्वत: विकसित केलेले इंजिन वापरणार आहे. नुकतीच लाँच झालेली सियाझ आणि लवकरच भारतीय बाजारात उतरविल्या जाणाऱ्या अर्टिगाच्या फेसलिफ्ट कारमध्ये हे इंजिन वापरले जाण्याची शक्यता आहे.
एका अहवालानुसार मारुती आपल्या नव्या अर्टिगामध्ये नवे टर्बोचार्ज्ड इंजिन वापरणार आहे. हे डिझेल इंजिन अर्टिगाच्या सर्व श्रेणींमध्ये असणार आहे. मारुती काही वर्षांपासून डिझेलच्या सर्व कारमध्ये फियाट कंपनीचे 1.3 लिटर डिझेल इंजिन वापरत आहे. या कंपनीच्या कार एवढ्या प्रमाणावर बाजारात येत होत्या की यामुळे फियाटही बिनधास्त बनली होती. मात्र, फियाटला इंजिनसाठी पैसा जास्त जात असल्याने मारुतीने दोन वर्षांपूर्वी स्वत:चे इंजिन विकसित करण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र, याकाळातच 2017 मध्ये बीएस-4 मानांकन लागू केले असताना लगेचच 2020 मध्ये भारत स्टेज 6 मानांकन लागू करण्यात येणार आहे. यामुळे मारुती समोर आव्हान होते. यावर मात करत कंपनीने नवे इंजिन विकसित केले आहे. 1.5 लिटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिनबाबत अद्याप खुलासा झाला नसला तरीही हे इंजिन सध्या केवळ अर्टिगा आणि सियाझच्या येणाऱ्या फेसलिफ्टमध्ये बसविण्यात येणार आहे. यानंतर फियाटच्या मल्टीजेट हे इंजिन लागलेल्या सर्व कारमध्ये हे इंजिन लागण्य़ाची शक्यता आहे.
म्हणजेच मारुती स्विफ्ट, डिझायर, बलेनो आणि एस-क्रॉस या कारमध्ये पुढील काळात हे नवे इंजिन लागण्याची शक्यता आहे. कारण सध्या या कारमध्ये वापरले जाणारे इंजिन बीएस-6 या मानांकनामध्ये येत नाही. नव्या इंजिनामध्ये फिक्स्ड आणि व्हेरिएबल जिऑमेट्री टर्बोचार्जर असण्याची शक्यता आहे.