विशाखापट्टणम: विशाखापट्टणमला विद्युत (इलेक्ट्रिक) गाड्याचे प्रदर्शन सुरु असताना या प्रर्दशनात जी. गौतम नावाचा तरुण इलेक्ट्रिक रॉकेट बाइक घेऊन आला. या इलेक्ट्रिक बाइकची खास गोष्ट म्हणजे या बाइकची किंमत केवळ १६ हजार रुपये इतकी आहे.
जी. गौतम यांनी सांगितले की, ही इलेक्ट्रिक बाइक त्याने अमेरिकेतील प्रसिद्ध ऑटोमोटिव्ह कंपनीपासून प्रेरणा घेऊन साकारली आहे. तसेच ही इलेक्ट्रिक बाइक तयार करण्यास केवळ तीन दिवस लागल्याचे त्याने स्पष्ट केले.
त्याने पुढे सांगितले की, या इलेक्ट्रिक बाइकमध्ये ३६ वोल्टची लिथियम बॅटरी आणि ३५० वोल्टच्या हब मोटरचा वापर करण्यात आला आहे. ही बाइक २ तास चार्ज केल्यानंतर ४० किलोमीटर चालू शकणार आहे. बाइकचा वेग सरासरी ४० किमी प्रतितास असल्याचे त्याने सांगितले. तसेच या बाइकचा आवाज येणार नाही व इलेक्ट्रिक बाइक असल्याने प्रदूषणदेखील होणार नाही.
विद्युत बाइक बनवणारा जी. गौतम यांनी याआधी स्टियरिंग नसलेली कार तयार केली होती. तिची किंमत ३२ हजार रुपये होती. हाइब्रिड बाइक आणि रेनबो स्कूटरची निर्मिती केल्यानेदेखील गौतम चर्चेत आला होता.