भारतात स्कूटर व मोटारसायकल या दुचाकींचा वापर अनेकदा अगदी ट्रकसारखा मालवाहू म्हणून केला जातो. केवळ मालवाहू म्हणूनच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाला बालबच्चांसह नेणे यात अनेकांना मोठी धन्यता वाटते. सर्वात मोठा स्टंट भर रस्त्यावर होत असूनही कोणी काही बोलत नाही वा कोणी त्यांना असे करू नका म्हणून सांगत नाही. ना पोलीस ना शेजारी-पाजारी, ना मित्र. अशा प्रकारचे बेकायदा वर्तन करणे यात अनेकांना बेकायदा वाटत नाही.
स्कूटर म्हणजे रिक्षा वा टॅक्सीच्या ऐवजी वापरण्याचे सार्वजनिक साधन आहे का, असाच प्रश्न पडतो. वाढत्या महागाईमुळे, पेट्रोलच्या किंमती वाढण्याने असे जर कोणी कृत्य करीत असेल तर त्याला काय म्हणावे. इतका भारत देश गरीब आहे का, की स्कूटर वा मोटारसायकल घेणे परवडते, ती नेहमी वापरणे परवडते पण कुटुंबाच्या, आपल्याच मुलाबाळांच्या सुरक्षेसाठी कोणतीही काळजी न घेता दुचाकीवर एकापेक्षा अनेकांना वाहून नेण्याची कसरत न करणे मात्र परवडत नाही. खरे म्हणजे कायद्यानुसार यावर बंदी आहे. हेल्मेट न वापरण्यावर जशी बंदी व दंड आहे तसेच स्कूटर वा मोटारसायकलीवर चालवणारा व त्याच्यामागे एक अशा फक्त दोन जणांनाच जाण्यास परवानगी आहे. इतकेच नव्हे तर कायद्यानुसार व सुरक्षिततेसाठी दोनही व्यक्तींनी हेल्मेट धारण करणे सक्तीचे आहे. पण लक्षात कोण घेतो, अशा थाटात सरकारला, नेत्यांना नावे ठेवमारे आपण, त्यांच्यावर तोंडसुख घेणारे आपण चलता है, टॅक्सी परवडत नाही असे सांगत अपघातांना निमंत्रण देत असतो.
अगदी छोटा अपघात झाला तर चार दिवस घरात बसण्यापेक्षा व दुखणं अंगावर काढत बसण्यापेक्षा हेल्मेट घातले किंवा दोनच जण स्कूटर वा मोटारसायकलवरून गेले तर काय बिघडते का, पण नाही... कायदेभंग हा जणू भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत आपल्यासाठीच आखून दिलेला मार्ग आहे, अशाच थाटात आपण सारे वावरत असतो. कायदे पाळल्याविना स्वातंत्र्य, त्याचे फायदे हवे आहेत, असे कसे. याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. दुचाकीस्वाराने त्याच्यासह दोनपेक्षा अधिक व्यक्ती रस्त्यावरून दुचाकी चालवताना नेल्या तर त्याला तीन महिने शिक्षा किंवा ५०० रुपये दंड वा दोन्ही होऊ शकतो. हा दंड वा ही शिक्षा करण्याचे पोलिसांनी अजूनतरी मनावर घेतलेले दिसत नाही. मात्र लोकांनी ते मनावर घ्यायला काहीच हरकत नसावी..