Okinawa autotech dealership Fire: इलेक्ट्रीक स्कूटरला आग लागल्याच्या घटनांमध्ये गेल्या महिन्यात मोठी वाढ झाली आहे. उष्णता एवढी वाढली आहे की, भल्या भल्या कंपन्यांच्या स्कूटरमधून धूर निघू लागला आहे. नाशिकमध्ये कंटेनरमधील स्कूटर जळाल्याची घटना ताजी असताना आता अख्खा शोरुमच जळून खाक झाल्याचे समोर आले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे ही आग ओकिनावा या इंडियन कंपनीच्या शोरुमला लागली आहे. या कंपनीवर चीनची मॉडेल भारतात आणण्याचाही आरोप होत आला आहे. या कंपनीने नुकतीच लाँच केलेली हाय रेंजची स्कूटर देखील हुबेहुब एका चीनच्या कंपनीच्या स्कूटरची कॉपी आहे. परंतू ही कंपनी मात्र एका भारतीयाची आहे. ओकिनावाने गेल्याच आठवड्यात आगीच्या घटनांमुळे काही हजार स्कूटर माघारी बोलविल्या होत्या.
तामिळनाडूच्या ओकिनावा डीलरशीपमध्ये ही आग लागली आहे. न्यूज एजन्सी आयएएनएस नुसार, इलेक्ट्रीक स्कूटर निर्माता कंपनी ओकिनावा ऑटोटेक (Okinawa Autotech) च्या तामिळनाडूतील शोरुममध्ये अचानक आग लागली. या आगीत पूर्ण शोरुम जळून खाक झाला आहे. कोणतीही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. स्थानिक लोकांच्या मदतीने आग विझविण्यात आली आहे. एका स्कूटरला पहिल्यांदा आगा लागली होती. परंतू ही आग एकामागोमाग एक अशा स्कूटरना लागली आणि अख्खा शोरूम जळाला.
ओकिनावाच्या इलेक्ट्रीक स्कूटरला आग लागण्याची ही चौथी घटना आहे. इलेक्ट्रीक स्कूटरच्या आगीच्या आजवरच्याअन्य घटनांत दोन जणांना जीव गमवावा लागला आहे. मार्चच्या अखेरीस घराच्या बंदीस्त पार्किंगमध्ये इलेक्ट्रीक स्कूटर पेटल्याने घरात झोपलेल्या वडील आणि मुलीचा गुदमरून मृत्यू झाला आहे. ओलाची हायफाय स्कूटरदेखील पुण्यात भर रस्त्यावर पेटली आहे. अन्य घटना जरी रस्त्यावर किंवा अन्य उघड्यावर झालेल्या असल्या तरी इलेक्ट्रीक स्कूटर या धोकादायक ठरू लागल्या आहेत.