नवी दिल्ली : जर तुम्ही बाजारात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. लोकप्रिय कंपनी ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) आज (22 नोव्हेंबर) आपले नवीन उत्पादन आणण्यासाठी सज्ज आहे. कंपनीची ही आतापर्यंतची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर असल्याचे म्हटले जात आहे. ओला इलेक्ट्रिक आणि कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी सोशल मीडियावर याची घोषणा केली आहे. या स्कूटरची किंमत जवळपास 80 हजार रुपये असू शकते असे म्हटले जात आहे.
दुपारी दोन वाजत होणार लाँचलाँचच्या एक दिवस आधी ओला इलेक्ट्रिकने ट्विट करून इव्हेंटची माहिती दिली आहे. ओला इलेक्ट्रिकने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, "आपले कॅलेंडर मार्क करा आणि सरप्राइजेसने भरलेल्या संध्याकाळसाठी सज्ज व्हा. उद्या दुपारी 2 वाजता भेटू." दरम्यान, याआधी कंपनीने टीझर रिलीज करून इलेक्ट्रिक स्कूटरची झलक दाखवली होती. कंपनीने टीझरसोबत लिहिले होते की, जर तुमचा फेस्टिव्ह सीजन तुमच्यासाठी पुरेसा नसेल, तर आम्ही तुम्हाला MoveOS 3 सह पार्टीत आमंत्रित करत आहोत, जी वर्षभर चालणार आहे.
नवीन इलेक्ट्रिक स्कूटरमधील फीचर्स...मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही कंपनीच्या Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरची परवडणारी व्हर्जन असू शकते. परवडणाऱ्या Ola S1 मध्ये सध्याच्या मॉडेलची बहुतांश फीचर्स कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, सध्याच्या 3KWh च्या तुलनेत ते लहान बॅटरी पॅकसह येऊ शकते. हे फक्त MoveOS सॉफ्टवेअरवर काम करेल, ज्यावर मागील S-1 व्हेरिएंट चालविला गेला होता. म्युझिक प्लेबॅक, नेव्हिगेशन, कंपेनियन अॅप्लिकेशन आणि रिव्हर्स मोड फीचर्स स्कूटरमध्ये मिळू शकतात.