गेल्या काही महिन्यांपासून इलेक्ट्रीक स्कूटरला आगी लागण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये हायटेक आणि महागडी ओला स्कूटर देखील आहे. एकाने तर काही दिवसांत स्कूटर नादुरुस्त झाल्याने आणि कंपनी त्याला विचारतही नसल्याने पेट्रोल ओतून आग लावली होती. या आगीच्या घटनांमुळे लोकांमध्ये ईलेक्ट्रीक स्कूटरबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच ओला इलेक्ट्रीक स्कूटर कंपनीच्या मालकाने ओलाच्या स्कूटरना आगी लागतच राहणार असे वक्तव्य केले आहे.
Ola Electric scooters चे मालक भाविश अग्रवाल यांनी या घटनेवर उशिराने का होईना, प्रतिक्रिया दिली आहे. ईलेक्ट्रीक स्कूटरना आगी लागण्याच्या घटना खूप दुर्मिळ आहेत. मात्र, या भविष्यात कधीही घडू शकतात, असे म्हटले आहे.
गेल्या महिन्यात ओलाची ईलेक्ट्रीक स्कूटर खूप बदनाम झाली आहे. आधीच ग्राहकांच्या शेकड्यांनी तक्रारी असताना पुण्यात ओला एस१ प्रोला आग लागली होती. तर दुसऱ्या घटनेत एका ग्राहकाने ही स्कूटर गाढवाला बांधून ओढायला लावली होती. तिसऱ्या घटनेत एकाने ओलाच्या स्कूटरला आग लावली होती. तर औरंगाबादमध्ये एका छोट्या अपघातात पुढच्या चाकाचा रॉडच मोडून पडला होता. आगीच्या कारणामुळे केंद्र सरकार कठोर झाल्यावर ओलाने १४०० हून अधिक स्कूटर माघारी बोलविल्या होत्या.
रविवारी एका खाजगी कार्यक्रमात आगीबद्दल विचारले असता ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल म्हणाले, "भविष्यात अशा घटना घडतील, परंतू आम्ही त्यावर तपासणी करू, एखादी सुधारणा करायची असल्यास ती देखील करू आणि समस्या सोडवू.''