ओला इलेक्ट्रीकनं (Ola Electric) 30 डिसेंबर 2021 पर्यंत फक्त 111 Ola S1 आणि Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर वितरित केल्या आहेत. केंद्राच्या वाहन पोर्टलनुसार, ओला इलेक्ट्रीकने फक्त चार राज्यांमध्ये त्यांच्या इलेक्ट्रीक स्कूटर वितरित केल्या असल्याची माहिती समोर आलीये. ओला इलेक्ट्रीकने अद्याप त्याच्या वितरणाबाबत कोणताही डेटा जारी केलेला नाही.
ओला इलेक्ट्रीकने त्यांच्या बहुतांश S1 आणि S1 Pro इलेक्ट्रीक स्कूटर्स कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये वितरित केल्या. वितरित केलेल्या 111 इलेक्ट्रीक स्कूटरपैकी 60 कर्नाटकात आणि 25 तामिळनाडूमध्ये होत्या. महाराष्ट्र आणि राजस्थान ही इतर दोन राज्ये आहेत जिथे गेल्या महिन्यात ओला इलेक्ट्रीक स्कूटरच्या अनुक्रमे 15 आणि 11 युनिट्सची नोंदणी झाली होती, अशी माहिती डेटावरून समोर आली.
ओला इलेक्ट्रीकने दावा केला होता की त्यांना त्यांच्या ई-स्कूटरसाठी सुमारे 90,000 बुकिंग्स मिळाले आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ओलाने आपली ई-स्कूटर लॉन्च केली होती. तसंच 15 डिसेंबरपासून यांची डिलिव्हरी सुरू करण्यात आली."10 दशलक्ष (एक कोटी) क्षमतेच्या दाव्यासह, ओला इलेक्ट्रीकने डिसेंबर महिन्यात केवळ 111 वाहनांची विक्री केली. डायरेक्ट टू कस्टमर हे कॉन्सेप्ट ही यातील मोठी बाधा बनत आहे का? हे खरं आहे का की इतर काही माध्यम/स्टार्टअप कंपनीची जाहिरात?," असं ट्वीट फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (FADA) अध्यक्ष विंकेश गुलाटी यांनी केले आहे.
इलेक्ट्रीक स्कूटरची डिलिव्हरी सुरू करण्यासाठी ओला इलेक्ट्रीकला जवळपास चार महिने वाट पाहावी लागली. बहुप्रतिक्षित मॉडेल लाँच झाल्यानंतर जवळपास चार महिने उशीर झाल्यामुळे पुरवठ्याच्या समस्या आल्या. यामुळे अलिकडच्या काळात प्रत्येक वाहन उत्पादकाला समस्यांचा सामना करावा लागत आहे.