भारतात वेगाने हातपाय पसरवत असलेली इलेक्ट्रीक टू-व्हीलर कंपनी Ola Electric (ओला इलेक्ट्रिक) ने तेवढ्याच वेगाने पैसे जमा केले आहेत. यामुळे कंपनीचे मुल्यांकन वाढून 5 अब्ज डॉलर झाले आहे. भारतीय रुपयात ही रक्कम ३७ हजार कोटी झाली आहे. कंपनीने 1,490.5 कोटी रुपयांची गुतंवणूक मिळविल्याची घोषणा केली आहे.
ओला इलेक्ट्रीकने सांगितले की, हा फंड टेकने प्राइवेट वेंचर्स, अल्पाइन अपॉर्च्युनिटी फंड, एडलवाइस सारख्या गुंतवणूक दारांकडून गोळा केला आहे. सीईओ भाविश अग्रवाल यांनी सांगितले की, ओला इलेक्ट्रीक भारतात ईव्ही क्रांती घेऊन आली आहे. जगासाठी भारतातून अत्याधुनिक उत्पादन होत आहे. ओला एस१ मुळे आम्ही स्कूटरच्या उद्योगालाच बदलून टाकले आहे. आता आम्ही बाईक आणि कारच्या श्रेणीमध्ये देखील उतरण्याचा विचार करत आहोत.
Ola ने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये Falcon Edge, SoftBank आणि इतरांकडून आणखी $200 दशलक्षची गुंतवणूक झाल्याची घोषणा केली होती. यानंतर ओला इलेक्ट्रिकचे बाजारमूल्य अंदाजे 3 अब्ज डॉलर झाले होते. ओला इलेक्ट्रिकने यापूर्वी टायगर ग्लोबल आणि मॅट्रिक्स इंडिया सारख्या इतर गुंतवणूकदारांकडून निधी उभारला होता. गेल्या वर्षी जुलैमध्ये ओला इलेक्ट्रिकने बँक ऑफ बडोदासोबत 10 वर्षांचा कर्ज वित्तपुरवठा करार जाहीर केला होता.
हा निधी अशा वेळी आलाय जेव्हा ओला इलेक्ट्रिक त्याच्या S1 आणि S1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटरचे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1 लाख रुपये आहे. तर S1 Pro ची किंमत 1.30 लाख रुपये आहे. निधीमुळे ओलाच्या 'फ्यूचरफॅक्टरी'ची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. या प्लांटमध्ये 10,000 पेक्षा जास्त महिला कार्यरत आहेत आणि जागतिक स्तरावर केवळ महिलांसाठी असलेल्या सर्वात मोठ्या कारखान्यांपैकी एक आहे.