गेल्या काही दिवसांमध्ये इलेक्ट्रीक स्कूटरला (Electric Scooter) आग लागल्याच्या अनेक बातम्या तुम्ही वाचल्या असतील. आता पुन्हा एकदा एका ईव्हीला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. मात्र यावेळी ती आग आपोआप लागली नसून, स्कूटरच्या मालकानंच चक्क आपली गाडी पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सन न्यूजच्या वृत्तानुसार, तामिळनाडूमध्ये एका व्यक्तीने आपल्या OLA S1 Pro स्कूटरवर पेट्रोल ओतून आग लावली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्या व्यक्तीने स्कूटरला आग लावली ती व्यक्ती स्कूटरचा परफॉर्मन्स आणि रेंज या दोन्हींबाबत नाराज होता असं सांगण्यात आलं. तर दुसरीकडे आणखी एका प्रकरणात, महाराष्ट्रातील एका व्यक्तीनं गाढवाच्या मागून त्याच्या ओला स्कूटरची वरात काढली.
तामिळनाडूत ओला स्कूटरला आग लावणाऱ्या व्यक्तीचं नाव डॉ. पृथ्वीराज असं आहे. तीन महिन्यांपूर्वीच त्यांना त्यांच्या ओला स्कूटरची डिलिव्हरी मिळाली होती. सुरूवातीपासूनच त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. त्यानंतर त्यांनी कंपनीकडे याची तक्रार केली. परंतु कंपनीला त्यात कोणतीही समस्या दिसली नाही. ४४ किलोमीटर प्रवास केल्यानंतर त्यांच्या स्कूटरनं काम करणं बंद केल्याचंही डॉ. पृथ्वीराज यांनी सांगितलं. यामुळे नाराज होत त्यांनी आपल्या स्कूटरवर पेट्रोल टाकत आग लावून दिली. तामिळनाडूच्या अंबुर बायपास रोडनजीक ही घटना घडली. तर दुसरी घटना महाराष्ट्रात घडली. एका व्यक्तीनं आपल्या ओला स्कूटरला कंटाळून गाढवामागून वरात काढली.
ओलानं स्कूटर परत मागवल्यागेल्या काही दिवसांमध्ये इलेक्ट्रीक स्कूटला आग लागल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर ओलानं १४४१ इलेक्ट्रीक स्कूटर्स परत मागवल्या होत्या. कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी यासंदर्भातील माहिती दिली होती. तसंच पुण्यातील घटनेबाबत बोलताना त्यांनी याचा तपास सुरू असल्याची माहिती दिली.