-हेमंत बावकर
ओला इलेक्ट्रीक स्कूटरने कालपासून दोन दिवस पुन्हा स्कूटर खरेदी करण्याची संधी उपलब्ध केली आहे. काल ज्यांनी ४९९ रुपये देऊन आठ महिन्यांपूर्वी स्कूटर बुक केलेली त्यांना तर आज ज्यांनी बुकिंग केलेले नाही अशांना विंडो ओपन करण्यात आली आहे. परंतू यामध्ये मोठा घोळ आहे. त्याचा विचार न करताच स्कूटर खरेदी करायला गेलात तर पेट्रोलवरची स्कूटर बरी असे म्हणण्याची वेळ येईल. (Is Ola S1 Pro easy on the pocket? why and whom to buy)
ओलाची एस1 प्रो ही इलेक्ट्रीक स्कूटर आधीच्या ग्राहकांना 1.08 लाखांत महाराष्ट्रात, मुंबई, पुण्यात उपलब्ध होती. कारण तेव्हा राज्याची अर्ली बर्ड सबसिडी जाहीर झाली होती. म्हणजे राज्याचे इव्ही वाहनांना प्रोत्साहन म्हणून १०००० रुपये नेहमीची सबसिडी आणि अर्ली बर्ड म्हणून प्रत्येक किलो वॅट बॅटरीच्या क्षमतेला ५००० रुपये सबसिडी दिली जात होती. ही अर्ली बर्ड सबसिडी सुरुवातील ३१ डिसेंबर २०२१ पर्यंतच मिळत होती. तिची मुदत ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढविण्यात आली होती. परंतू, ओला आता खरेदीची संधी देत आहे व या स्कूटर एप्रिलच्या अखेरीपासून डिलिव्हर केल्या जाणार आहेत. यामुळे अर्ली बर्ड सबसिडी तुम्हाला मिळणार नाही.
ओला एस १ प्रोची बॅटरी ४ केव्ही आहे. म्हणजे तुम्हाला थेट २०००० रुपयांचा लाभ होणार होता. परंतू ओला आता 1.08 लाखां ऐवजी या स्कूटरचे १.३१ लाख रुपये आकारत आहे. शिवाय आरटीओ चार्जेस, हायपोथिकेशन, लोन प्रोसेसिंग चार्जेस, डॉक्युमेंट चार्जेस असे 5000 रुपये आकारले जात आहेत. यामुळे ही स्कूटर आजच्या घडीला १.३६ ते १.३७ लाखाला पडत आहे. ही रक्कम आघाडीच्या पेट्रोल स्कूटरच्या किंमतींपेक्षा पन्नास हजारांनी जास्त आहे.
आता कोणी घ्यावी कोणी घेऊ नये....हौस असेल तर कोणीही घेऊ शकतो. परंतू व्यावहारिक दृष्ट्या विचार केला तर ज्याचे दिवसाचे रनिंग ५०-६० किमी किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्याने ओलाची स्कूटर घेण्याचा विचार करावा. पेट्रोल स्कूटरचे मायलेज ४० आणि एका लीटरचा दर जर १११ किंवा ११५ रुपये पकडला आणि जर तुमचे दिवसाचे रनिंग १० ते १५ किमी किंवा त्यापेक्षा कमी असेल तर ओलाच्या इलेक्ट्रीक स्कूटरचा अजिबात विचार करू नका. व्यावहारिक दृष्ट्या ते तुम्हाला परवडणारे नाही. कारण ओला स्कूटरसाठी तुम्ही मोजत असलेले ५०००० रुपये आणि त्यावरील पुढील तीन वर्षांचे बँका आकारणारे व्याज पाहिले तर या रकमेत तुम्ही पुढची पाच सहा वर्षे पेट्रोल भरू शकणार आहात. शिवाय ओलाच्या ग्राहकांना ज्या समस्या येत आहेत, त्याची डोकेदुखीही कमी होणार आहे.
जर तुम्ही रनिंग कमी असेल आणि ओलाची स्कूटर घेतली तर घोडं भाडं तेच होणार आहे. जेवढा पाच वर्षातील तुमचा पेट्रोलचा खर्च असेल तेवढे पैसे तुम्ही आताच ओलासाठी मोजणार आहात. यामुळे सारासार विचार करून निर्णय घ्या. कोणत्याही इलेक्ट्रीक स्कूटरचा फायदा हा आहे की, तुम्ही पर्यावरण वाचविण्यासाठी काहीसा हातभार लावू शकणार आहात. वीज निर्मितीसाठी कोळसा जरी जाळला जात असला तरी एका स्कूटरमधून जेवढे उत्सर्जन होते त्यापेक्षा काहीसे कमी उत्सर्जन तुम्ही इव्ही स्कूटर वापरून वाचवू शकणार आहात.