Ola Scooter Fire: भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची सुरुवात झाली तेव्हा अनेकदा यात आग लागण्याच्या घटना घडत होत्या. यामुळे ग्राहकांमध्येही EV स्कूटरबाबत भीती बसली होती. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये अशा घटना कमी झाल्या आहेत. पण, आता पुन्हा एकदा अशाच एका घटनेने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. इलेक्ट्रिक स्कूटरच्या स्फोटामुळे 7 जण जखमी झाले आणि अख्ख घरही उद्ध्वस्त झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, हे ताजे प्रकरण छत्तीसगडच्या रायपूरमधील कृष्णा नगरचे आहे. डॉ. फैजान आणि त्यांचे कुटुंब या स्फोटाचे बळी ठरले. या घटनेत पती-पत्नीसह सात जण जखमी झाले आहेत. ही घटना Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरसोबत घडली. आगीमुळे घराच्या खिडक्या, दरवाजासह अनेक साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.
मीडिया रिपोर्टनुसार, या अपघातानंतर झालेल्या नुकसानीचा व्हिडिओ डॉक्टर फैजान यांच्या बहिणीने दोन दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आगीमुळे घर आणि सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. व्हिडिओ क्लिपमध्ये आणखी काही दुचाकीदेखील आगीत जळून खाक झाल्याच्या दिसत आहेत. डॉक्टर फैजान यांनी रात्री इलेक्ट्रिक स्कूटर चार्जिंगला लावून ठेवली आणि 1 वाजण्याच्या सुमारास झोपायला गेले. काही तासांनंतर स्कूटरला आग लागली आणि त्यासोबत अनेक वस्तू जळून खाक झाल्या.