नवी दिल्ली : भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक स्कूटरची वाढती मागणी पाहता, ओला यावर्षी दिवाळीपर्यंत नवीन इलेक्ट्रिक स्कूटर OS 3 लॉन्च करू शकते. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बरेच अपग्रेड्स पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
ओलाचे मालक भाविश अग्रवाल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही स्कूटर लॉन्च करण्याबाबत माहिती दिली आहे. ही स्कूटर बाजारात येण्यासाठी सज्ज असून दिवाळीपर्यंत ही स्कूटर तुमच्यापर्यंत पोहोचेल, अशी माहिती त्यांनी दिली. अॅडव्हान्स कनेक्टिव्हिटीसह अनेक सॉफ्टवेअर आणि फीचर अपग्रेडसह ही नवीन जनरेशनची स्कूटर असणार आहे.
ओला OS 3 मध्ये बरेच नवीन अपडेट्स मिळतील, असा खुलासा भाविश अग्रवाल यांनी केला आहे. तसेच, ही स्कूटर आकर्षक बनवण्यासाठी अनेक बदल करण्यात आल्याचेही म्हटले आहे. याशिवाय, या स्कूटरच्या फिचर्सवर नजर टाकली तर यामध्ये हिल होल्ड, हायपर चार्जिंग, कॉलिंग आणि की शेअरिंग, प्रॉक्सिमिटी अनलॉक, मूड्स, जेन व्ही 2 सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
हिल होल्ड हे एक असे फीचर आहे, ज्यामध्ये तुम्ही उंचीच्या ठिकाणी जाता तेव्हा स्कूटर उतारावरून मागे सरकत नाही. दुसरीकडे, जर आपण सुपरचार्जिंगवर नजर टाकली तर, यावेळी ओला आपल्या चार्जरचा एम्पिअर वाढवेल, ज्यामुळे स्कूटर चार्ज करण्यासाठी देखील कमी वेळ लागेल.
कंपनीने स्कूटरची किंमत अजून जाहीर केलेली नाही. या दिवाळीच्या मुहूर्तावर लाँचिंगसोबतच स्कूटरच्या किमतींची माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, ओलाच्या मालकाने सांगितले की, स्कूटरचे सॉफ्टवेअर आधीच तयार झाले आहे. यासोबतच त्यांनी ओला इंजिनिअरिंगचेही खूप कौतुक केले आहे.