OLA Electricच्या अडचणी थांबायचे नाव घेत नाहीत. OLAने इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केल्यापासून अनेकदा गाड्यांना आग लागल्या किंवा एखादा पार्ट तुटल्याच्या घटना घडल्या आहेत. आता त्यांच्या नवीन स्कूटरसोबतही तशाच प्रकारची घटना घडली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजीव जैन नावाच्या व्यक्तीने दावा केलाय की, सहा दिवसांपूर्वी घेतलेल्या त्याच्या OLA S1 Proचे चाक तुटून वेगळे झाले.
संजीव जैनच्या दाव्यानुसार, त्याच्या नवीन OLA S1 Proचे सस्पेंशन आणि चाक तुटून (Suspension Break) गाडीपासून वेगळे झाले. त्याच्या गाडीचे दोन तुकडे झाल्याचा फोटोही सध्या इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. OLA S1 Pro चा मालक संजीव जैनने सोशल मीडिया पोस्टमधून सांगितले की, त्याने फक्त सहा दिवसांपूर्वीच ही गाडी घेतली होती. या पोस्टमुळे OLA S1 Pro च्या विक्रीवर परिणाम पडू शकतो.
विशेष म्हणजे, सप्टेंबर महिन्यात OLA Electric सर्वाधिक विक्री होणारी कंपनी ठरली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजीव जैन नावाच्या व्यक्तीने त्याच्या तुटलेल्या स्कूटरचे फोटोज OLA Electric ग्रुपमध्ये पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये त्याची लाल रंगाच्य OLA S1 Proचे सस्पेंशन तुटलेले दिसत आहे. संजीव जैनने सांगितले की, तो आपल्या कॉलोनीत गाडी चालवत होता, तेव्हा स्कूटरचे चाक तुटले.
विशेष म्हणजे, यापूर्वी अनेकदा ओलाला आपल्या स्कूटरच्या गुणवत्तेवरुन टीकेचा सामना करावा लागला आहे. आता लवकरच कंपनी आपल्या इलेक्ट्रीक स्कूटरच्या नवीन मूवओएस 3ला लॉन्च करणार आहे. दिवाळी 2022 पर्यंत हे येण्याची शक्यता आहे. आता कंपनी आपल्या सॉफ्टवेअरसोबतच हार्डवेअरवर कधी लक्ष देणार, हा मोठा प्रश्न आहे.