ओला स्कूटरने गेल्या वर्षी जेवढी प्रसिद्धी कमावली तेवढी अवगुणांमुळे गमावली आहे. या स्कूटरमुळे शांतता मिळायची सोडून लोकांची मनशांती भंग झाली आहे. कोणाला सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम, कोणाला फिटिंगचा तर कोणाला रिव्हर्स मोडचा हे कमी होते म्हणून की काय गेल्या महिन्यात ती धू धू पेटली. एवढे सगळे करून भागले नसेल तर ती ओला कुठली. काल-परवा तर ही स्कूटर तोंडावर आपटली आहे.
ओलाचे सीईओ काही दिवसांपूर्वीच ही ओला एस १ प्रो स्कूटर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दाखविण्यासाठी घेऊन गेले होते. यावेळी त्यांनी गडकरींना आपले भविष्यातील प्लॅन सांगितले. त्याच्या दुसऱ्या-तिसऱ्याच दिवशी ओलाच्या स्कूटरने नवा उद्योग केला आहे. रिव्हर्स मोडवर लोकांचा जीव जाण्याची वेळ आलेली असताना आता ओलाच्या स्कूटरचे पुढचे चाकच तुटून पडले आहे.
पुण्यातल्या आगीनंतर आता औरंगाबादमध्ये ही घटना घडली आहे. ओलाची स्कूटर एका दुचाकीवर आदळली. या अपघातात ओलाच्या स्कूटरला काहीच ओरखडे आलेले दिसत नाहीएत. परंतू तिचे पुढील चाक मोडलेले दिसत आहे. ओलाचे सस्पेन्शन आणि रॉड तुटले आहे. ओला स्कूटरच्या मालकाला देखील किरकोळ जखमा झाल्या आहेत.
तसे पाहता अपघातावेळी पुढील सस्पेन्शन तुटणे हे स्कूटरसाठी सामान्य आहे. परंतू, ते छोट्या अपघातात नाही तर मोठ्या अपघातात तुटते. हे प्रकार रॉयल एन्फिल्डसारख्या बाईकसोबतही होते. परंतू ओलाची स्कूटर सुरुवातीपासूनच गुणवत्तेच्या वादात सापडलेली आहे. जवळपास दीड लाखांवर पैसे मोजूनही ग्राहकांना धड स्कूटर देण्यात आलेली नाही. अनेकांची स्कूटर तर महिन्याभरात दोन-तीनदा सर्व्हिस सेंटरवर जाऊन आलेली आहे. ओला घरी येऊन सर्व्हिस करते, परंतू ते रेग्युलर झाले. समस्यांची दुरुस्ती ही सर्व्हिस सेंटरमध्येच केली जाते.
गेल्याच महिन्यात ओलाच्या प्रसिद्ध स्कूटरने पुण्याच्या रस्त्यावर पेट घेतला होता.