ओलाची ईलेक्ट्रीक स्कूटर जशी आली तशी तिच्या समस्या वाढत चाललेल्या. गेल्या काही काळापासून ओलाच्या स्कूटरच्या समस्या रोजच्याच झालेल्या असल्याने तिकडे फारसे कोणी लक्षही देत नव्हते. ओलाच्या स्कूटरची एक सर्वात मोठी समस्या होती, ती म्हणजे तिचे पुढच्या चाकाचा एक्सलच तुटून पडत होता. यामुळे चालकाला गंभीर दुखापत होण्याची शक्यता होती. नुकत्याच झालेल्या अपघातात तेच झाले आहे.
ओलाने अद्यापही आपल्या स्कूटरमधील ही जिवघेणी समस्या दूर केलेली नाही. त्याऐवजी ओलाने दोन आर्म असलेली कमी रेंजची स्कूटर बाजारात आणली आहे. परंतू जुनी समस्या असलेली स्कूटर आजही विकली जात आहे. Ola S1 च्या नुकत्याच झालेल्या अपघातात स्कूटरचे फ्रंट सस्पेंशन तुटलेले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे स्कूटर चालविणारी महिला ही ३५ च्या स्पीडने जात होती. ती स्कूटरवरून पडल्याने गंभीररित्या जखमी झाली आहे. समकित परमार नावाच्या व्यक्तीने याचे ट्विट केले आहे, त्याची पत्नी स्कूटर चालवत असताना पुढील सस्पेंशन तुटल्याने पुढे रस्त्यावर जाऊन आदळली आहे. परमारच्या दाव्यानुसार त्याची पत्नी आयसीयुमध्ये आहे. तिच्या तोंडाला, डोक्याला मार बसला आहे. अपघाताचे व पत्नीचे फोटो त्याने पोस्ट केले आहेत.
Ola S1 आणि S1 Pro हे दोन्ही फ्रंट सिंगल फोर्क सस्पेन्शनच्या स्कूटर आहेत. तर ओलाने S1 Air ही स्कूटर गेल्या वर्षी दोन फोर्कची लाँच केली आहे. S1 आणि S1 Pro मागील बाजूस मोनोशॉक सस्पेंशन वापरतात, तर S1 एअरला त्याऐवजी ड्युअल शॉक मिळतात. परंतू एअरची किंमत आणि रेंजही कमी आहे.