देशात सध्या इलेक्ट्रीक दुचाकी विकणाऱ्यांमध्ये ओलाचा पहिला नंबर आहे. अनेक समस्या असल्या तरी ओलाची स्कूटर खप खप खपत आहे. असे असले तरी ओलानेही सर्वांना पर्याय देण्यासाठी पाच-सहा स्कूटर लाँच केल्या आहेत. म्हणजेच ८० हजारापासून दीड लाखापर्यंत सर्वांना ऑप्शन दिले आहेत. यात थोडीफार बॅटरी आणि पिकअप आदीमध्ये फेरफार केला आहे.
ईलेक्ट्रीक स्कूटर परवडते म्हणून लोक घेत आहेत, परंतू या स्कूटरची बॅटरी हा सर्वात मोठा खर्च आहे. एकदा का बॅटरीची वॉरंटी संपली किंवा बॅटरी खराब झाली अन् ती वॉरंटीत नसेल तर तुमचा खिसा भसकन खाली झाला म्हणून समजा.
बाजारात धुमाकूळ घालण्यासोबतच हा ब्रँड अनेकवेळा चर्चेत राहिला आहे, कधी आगीच्या घटनांमुळे तर कधी स्कूटरच्या गुणवत्तेबाबत सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. आता स्कूटरच्या बॅटरीची चर्चा होत आहे. सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरवर ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीच्या किंमतीबाबत दावा केला जात आहे.
ओलाच्या स्कूटरची बॅटरी स्कूटरच्या किंमतीपेक्षा निम्म्याने जास्त आहे. सामान्यत: इलेक्ट्रीक वाहनांच्या बॅटरीची किंमत वाहनाच्या किंमतीच्या ४० ते ५० टक्के असते. OLA S1 च्या बॅटरी पॅकची किंमत 66,549 रुपये, S1 प्रोच्या बॅटरीची किंमत 87,298 रुपये असल्याचे एका युजरने त्य़ाच्या पोस्टमध्ये सांगितले आहे. पोस्टमध्ये शेअर केलेल्या फोटोत एक नग असे लिहिलेले आहे. यामुळे ही एका बॅटरीची किंमत दिसत आहे. असे असले तरी त्यात संपूर्ण पॅकेज असू शकते. याशिवाय पॅकेजमध्ये एमआरपीची किंमत देण्यात आली आहे.
Ola च्या इलेक्ट्रिक स्कूटर किंमतीबद्दल बोलायचे झाले तर S1 Air ची किंमत 84,999 रुपये, S1 ची किंमत 99,999 रुपये आणि S1 Pro ची किंमत 1,27,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या बॅटरींची किंमत पाहता नवीनच स्कूटर घेणे त्या ग्राहकाला परवडणार आहे. ओला स्कूटरवर ५ वर्षांची वॉरंटी देत आहे.