Ola Scooter: आगीच्या घटनांमुळे चर्चेत आलेली ओला स्कूटर (Ola Scooter) आता नवीन प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. एका व्यक्तीने त्याच्या ओला इलेक्ट्रिक स्कूटरचे दोन तुकडे झाल्याची तक्रार केली आहे. त्याने ट्विटरवर आपल्या गाडीचा फोटो शेअर करत कंपनीकडे दुसरी गाडी देण्याची मागणी केली आहे. त्याच्या या ट्विटनंतर अशाप्रकारच्या तक्रारींचा पाऊस पडतोय.
स्कूटरचे पुढचे चाक वेगळे झालेट्विटरवर श्रीनाध मेनन नावाच्या व्यक्तीने ओला स्कूटरचे दोन तुकडे झाल्याची तक्रार केली. त्यांने आपल्या ट्विटमध्ये ओला इलेक्ट्रिक आणि कंपनीचे संस्थापक भाविश अग्रवाल (Bhavish Aggarwal) यांनाही टॅग केले आहे. या पोस्टमध्ये काळ्या रंगाच्या ओला स्कूटरचे पुढील चाक तुटलेले दिसत आहे. युजरने आपल्या पोस्टसह लिहिले की, 'कमी वेगाने गाडी चालवत असतानाही या स्कूटरचा पुढचा भाग तुटला. आता मी या गंभीर आणि धोकादायक परिस्थितीला तोंड देत आहे. मला स्कूटर बदलून हवीये.'
25 किमी प्रतितास वेगाने ओला स्कूटरचे दोन तुकडे झालेमेनन यांच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर ओला स्कूटर खराब झाल्याच्या तक्रारींचा पाऊस पडतोय. एकापाठोपाठ एक अनेकजण त्यांच्या ओला स्कूटरच्या गुणवत्तेबद्दल पोस्ट करत आहेत. एका व्यक्तीने ट्वीट केले की, त्याच्या ओला स्कूटरचा पुढचा भाग डोंगराळ रस्त्यावर फक्त 25 किमी प्रतितास वेगाने जात असताना तुटला. सपाट रस्त्यावरुन चालणाऱ्या वाहनचालकासोबतही अशीच घटना घडत आहे. यावर ओला इलेक्ट्रिकने उत्तर दिले की, ते लवकरच युझरशी बोलतील.
आग लागल्याची घटनायापूर्वी पुण्यात ओला इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. पुण्यासह इतर काही भागांमध्येही अशाच प्रकारची घटना घडली. याशिवाय, अनेकांच्या स्कूटर अचानक बंद पडल्या आणि कंपनीकडूनही काही प्रतिसाद मिळाला नाही. अशा अनेक तक्रारी ग्राहक करत आहेत. ग्राहक सोशल मीडियावर अनेक दिवसांपासून ओलाच्या सॉफ्टवेअर तसेच स्पीड, रिव्हर्स मोड आणि इतर फिचर्समध्ये फॉल्ट असल्याच्या तक्रारी करत आहेत.