ओला ईलेक्ट्रीक स्कूटरने मोठा गाजावाजा करून इलेक्ट्रीक स्कूटर लाँच केली खरी परंतू ग्राहकांच्या अपेक्षा वेळेत पूर्ण करण्यास सपशेल अपयशी ठरली आहे. ओलाने गेल्या वर्षी १५ ऑगस्टला कसलीही तयारी नसताना दोन मॉडेल लाँच केली होती. यापैकी बेसिक स्कूटर असलेली एस१ या स्कूटरचे उत्पादनच बंद करण्यात येत असल्याचे कंपनीने बुक करणाऱ्या ग्राहकांना कळविले आहे.
ओलाच्या एस१ प्रो स्कूटरला मोठी मागणी आहे. यामुळे कंपनीने याच स्कूटरकडे लक्ष पुरविले असून एस१ ची बुकिंग केलेल्यांना सुरुवातीला ओलाने एस१ प्रोचे हार्डवेअर असलेली स्कूटर दिली होती. मात्र, त्यांना सॉफ्टवेअर, अन्य बाबी या बेसिक दिल्या आहेत. परंतू आता कंपनीने असे न करता या स्कूटरचे उत्पादनच थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ग्राहकांना तसे मेल करण्यात आले असून त्यांच्यासमोर दोन पर्याय ठेवण्यात आले आहेत.
ओला एस १ चे बुकिंग केलेल्या ग्राहकांना ही स्कूटर मिळण्यासाठी ९ ते ११ महिने वाट पहावी लागू शकते. यामुळे या ग्राहकांना कंपनीने एकतर एस१प्रो साठी अपग्रेड करा किंवा बुकिंग रद्द करण्याचा पर्याय दिला आहे. २१ जानेवारीला ओला अॅपवर पेमेंट विंडो खुली केली जाणार आहे. यामध्ये ज्यांनी पहिले २०००० रुपये भरले आहेत, त्यांना फायनल पेमेंट करण्याची संधी दिली जाणार आहे. यावेळी एस१ चे ग्राहक एस१ प्रोसाठी पैसे देऊ शकतात, असे कंपनीने कळविले आहे.
या ऑर्डरची डिलिव्हरी जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत केली जाणार आहे. डिस्पॅच झाल्यानंतर ग्राहकांना १० ते १२ दिवस वाट पहावी लागणार आहे. हे सारे ग्राहकाचे शहर, आरटीओवर अवलंबून असणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ओला एस१ च्या ग्राहकांना जर तीच स्कूटर हवी असेल तर ते वाट पाहू शकतात. जेव्हा एस१ चे उत्पादन सुरु केले जाईल तेव्हा ते फायनल पेमेंट करू शकणार आहेत किंवा ओला अॅप व कस्टमर केअर कडे संपर्क करून बुकिंग रद्दही करू शकतात.