नवी दिल्ली : ओला इलेक्ट्रिक स्कूटर लाँच झाल्यापासून भारतीय बाजारपेठेत खूप लोकप्रिय झाली आहे. दरम्यान, कंपनीने अलीकडेच काही शहरांमध्ये या स्कूटरची टेस्ट राइड सुरू केली आहे. आत्तापर्यंत, कंपनीने 1,000 हून अधिक शहरांमध्ये आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या टेस्ट राइड सुरू करण्याची योजना आखली आहे. ओला इलेक्ट्रिकने एका निवेदनात म्हटले आहे की, सुरुवातीच्या टप्प्यात ज्यांनी कंपनीच्या ओला S1 आणि S1 pro स्कूटर खरेदी केल्या आहेत किंवा रिझर्व्ह केल्या आहेत, त्यांच्यासाठीच टेस्ट राइड खुली असणार आहे.
सॉफ्टबँक ग्रुप कॉर्पोरेशन आणि टायगर ग्लोबल मॅनेजमेंटद्वारे समर्थित असलेल्या या फर्मने डिसेंबरपर्यंत सर्व ग्राहकांसाठी टेस्ट राइड सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. टेस्ट राइड्स वाढवण्याची योजना यासाठी आली आहे, कारण देशातील उच्च इंधनाच्या किमती ग्राहकांना गॅसोलीनवरून इलेक्ट्रिक वाहनांकडे जाण्याचा विचार करण्यास प्रेरित करत आहेत. कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी सांगितले की, 15 डिसेंबरपर्यंत जवळपास 1000 शहरांमध्ये ओला स्कूटरची टेस्ट राइड सुरू केली जाईल.
कंपनीने 15 ऑगस्ट रोजी आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली. प्री-बुकिंग उघडल्याच्या 24 तासांत कंपनीला 100,000 ऑर्डर मिळाल्या. मात्र, ऑक्टोबरमध्ये डिलिव्हरीचे लक्ष्य ठेवण्यात आले होते, पण थोडा विलंब झाला आणि यामुळे संभाव्य खरेदीदार सोशल मीडियावर ओलावर नाराजीच्या प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, ओला S1 इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1 लाख रुपये आहे, तर S1 pro ची किंमत 1.30 लाख रुपये आहे. या किंमती एक्स-शोरूममधील आहेत आणि राज्य अनुदानावर अवलंबून बदलू शकतात.
ओला S1 ची सिंगल चार्जिंगनंतर रेंज 120 किमी आहे, तर S1 pro ची रेंज 180 किमी आहे. S1 pro ला मोठी बॅटरी मिळते, तर त्याची टॉप स्पीड 115 किमी प्रतितास आहे. ओला S1 मॉडेलमध्ये 2.98 केडब्ल्यूएच बॅटरी आहे, तर S1 pro मध्ये 3.97 केडब्ल्यूएच बॅटरी आहे. दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर पूर्ण एलईडी लाइटिंग पॅकेज आणि 7.0-इंच टच डिस्प्लेसह येतात, ज्यामध्ये नेव्हिगेशनचे देखील फीचर मिळते.
डिस्प्ले 3-जीबी रॅमसह ऑक्टा-कोर प्रोसेसर दिले आहे आणि वाय-फाय, ब्लूटूथ आणि 4 जी कनेक्टिव्हिटी सुद्धा आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरच्या निर्मितीसाठी ओलाने 10 हजार महिलांना काम दिले आहे. तसेच वर्षाला 20 लाख स्कूटर बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. याशिवाय, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि लॅटिन अमेरिकेतही या स्कूटरची निर्यात केली जाणार आहे.