गुगलला मॅपसाठी करोडो रुपये द्यावे लागतात म्हणून ओलाने काही दिवसांपूर्वीच स्वत: चा मॅप लाँच केल्याचे जाहीर केले होते. आता हाच ओलाचा मॅप वादात सापडला असून मॅप माय इंडियाने आपला डेटा चोरल्याचा गंभीर आरोप ओलावर केला आहे.
मॅप माय इंडियाची (MapMyIndia) मूळ कंपनी सीई इंफो सिस्टिमने ओलाला नोटीस पाठविली आहे. यामध्ये ओला मॅप्सचा इंटरफेस विकसित करण्यासाठी बेकायदेशीररित्या डेटा कॉपी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ओलाने मॅप माय इंडियाचा डेटा कॅचे आणि सेव्ह केल्याचा दावा फोर्ब्स इंडियाने केला होता. हा डेटा एकत्र करून २०२१ मध्ये झालेल्या एका सामंजस्य करारानुसार मिळालेल्या लायसन्सद्वारे रिव्हर्स इंजिनिअर केल्याचे म्हटले होते.
याकडे मॅप माय इंडियाचे लक्ष वेधले गेल्याने त्यांच्या कंपनीने याचा शोध सुरु केला. यानंतर पाठविलेल्या नोटीसमध्ये आमच्या क्लायंटचे API आणि SDK कॉपी केले असून तुमच्या फायद्यासाठी हा डेटा वापरण्यात आल्याचे म्हटले आहे. याचबरोबर ओलाने एपीआय आणि मॅप डेटा ओपन सोर्सद्वारे स्वतंत्रपणे विकसित केल्याचा दावा केला होता, त्यालाही यात विरोध करण्यात आला आहे. ओलाच्या कृतीने 2021 च्या कराराच्या अटींचे उल्लंघन केले आहे. बौद्धिक संपदा कायद्यांतर्गत सह-मिश्रण आणि रिव्हर्स इंजिनिअरिंगला स्पष्टपणे प्रतिबंध करण्यात आला आहे, असेही यात म्हटले आहे.
गुगल मॅपला वर्षाला १०० कोटी रुपये द्यावे लागत होते. यामुळे आपला मॅप लाँच करून ओलाने गुगलला दिला जाणारा खर्च शून्य केला होता. तसेच गुगल मॅप आणि अझूरचा वापर बंद केला होता. आता जर मॅप माय इंडियाचा डेटा चोरला असेल तर ओलाला हे प्रकरण भारी पडणार आहे. याचा परिणाम ओलाच्या ६१०० कोटींच्या आयपीओवरही होणार आहे. १ ऑगस्टपासून हा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुला होणार आहे.