- मनोज गडनीस
ट्रोल-डिझेल, सीएनजी आदी इंधनाच्या किमतीमध्ये भरमसाट वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर आता वाहनप्रेमी लोकांनी मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देण्यास सुरुवात केली आहे. अर्थात, या वाहनांद्वारे येणारा प्रवास खर्च हा प्रति एक किलोमीटर सरासरी एक रुपया इतका कमी असल्याने लोकांची इंधनावरील खर्चात तर बचत होत आहेच, पण या वाहनांमधून प्रदूषण होत नसल्यामुळे पर्यावरणस्नेही प्रवासाचा आनंददेखील लोकांना मिळत आहे.
दुसरा मुद्दा म्हणजे, आता वाहने ही केवळ लक्झरी राहिलेली नाहीत तर आता ती लोकांसाठी दैनंदिन गरज झालेली आहे. अशा वेळी जर इंधन महागले असेल तर रोजचा प्रवास करणेही परवडणार नाही आणि सारेच आर्थिक गणित विस्कळीत होईल. अशा स्थितीत पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक वाहन हा एक उत्तम मार्ग ठरू शकतो, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.
इंधनाचे गणित कसे आहे?
पेट्रोल आणि डिझेल या प्रमुख इंधनाच्या दरांनी १०० रुपयांचा टप्पा पार केल्यामुळे अनेकांसाठी ही इंधने आता आवाक्याच्या बाहेर गेलेली आहेत. तसेच, ए,बी,सी,डी अशा अर्थात साध्या ते आलिशान अशा कोणत्याही गाडीने जर प्रवास करायचा तर त्या वाहनांचा ॲव्हरेज हा प्रति किलोमीटर किमान १० ते कमाल १४ रुपये इतका आहे.
मुंबईसारख्या शहरांत जिथे दिवसाच्या कोणत्याही प्रहरी वाहतूककोंडी असते अशा ठिकाणी ट्राफिकमध्ये अडकल्यानंतर हा ॲव्हरेज प्रति किलोमीटर ६ ते ८ रुपये इतकाच मिळतो. आता पेट्रोल-डिझेलच्या किमती आणि मिळणारा हा ॲव्हरेज जर विचारात घेतला तर हा हिशोब प्रति किलोमीटर खर्च सरासरी १० ते १२ रुपये प्रति किलोमीटर इतका जातो.
गेल्या वर्षभरापर्यंत सीएनजीच्या किमती या ४० रुपये प्रति किलोच्या आसपास होत्या. त्यामध्ये आता दुपटीने वाढ होत प्रति किलो दर हे ८६ रुपये झाले आहेत. गाडीने जरी सरासरी १० किलोमीटर प्रति किलो ॲव्हरेज दिला तरी प्रति किलोमीटर हा प्रवास ८ रुपये ६० पैसे दराने पडतो. चार वर्षांपूर्वीपर्यंत जेव्हा सीएनजीच्या किमती २० आणि २२ रुपये प्रति किलो होत्या तेव्हा या इंधनाद्वारे चालणाऱ्या गाडीचा खर्च ८० पैसे ते एक रुपया प्रति किलोमीटर इतका होत होता. आता मात्र त्यातही लक्षणीय वाढ झाली आहे.
या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहनांचा विचार केला तर, जर गाडीची संपूर्ण बॅटरी चार्ज झाली तर इलेक्ट्रिक वाहन त्याच्या बॅटरीच्या क्षमतेनुसार अंदाजे ३०० ते ३५० किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते. याकरिता लागणाऱ्या विजेचे दर हे व्यावसायिक आहेत. मात्र, सरासरी हिशेब काढला तर प्रति किलोमीटर १ रुपया ते १.१५ पैसे या दरम्यान या वाहनाचा दर पडतो.
देशात इलेक्ट्रिक वाहने किती ?
दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणाऱ्या एकूण १२ कंपन्या देशामध्ये आहेत. सप्टेंबर २०२२ पर्यंत यांचा एकत्रित आकडा हा १३ लाख ९२ हजार २६५ इतका आहे. सप्टेंबर २०२१ च्या तुलनेत यंदाच्या वर्षी झालेली वाढ ही तब्बल १५८ टक्के जास्त आहे.
आगामी काळात काय ट्रेन्ड असेल ?
- तीन ते चार वर्षांपासून इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत आहे.
- सुरुवातीला कोरियन, जपानी कंपन्यांनी वाहने सादर केली होती.
- या वाहनांमध्ये असलेली क्षमता आणि ग्राहकांची खर्चात होणारी बचत लक्षात घेता, आता वाहन निर्मिती करणाऱ्या सर्वच कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीस सुरुवात केली आहे.
- दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहने आगामी काळात प्रामुख्याने इलेक्ट्रिकवर येताना दिसतील.
- ही वाहने पर्यावरणस्नेही असल्यामुळे सरकारने यातील काही विशिष्ट वाहनांसाठी अनुदान योजनादेखील जाहीर केलेली आहे.
- इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी केल्यानंतर, ज्या कंपनीचे वाहन आहे, त्यांच्यातर्फेच घर किंवा कार्यालयामध्ये चार्जिंगची व्यवस्था केली जाते.
- या चार्जिंगकरिता होणारा विजेचा खर्च वेगळा ठेवण्यासाठी विजेचे वेगळे मीटरदेखील बसविण्यात येते.
- जर तुम्ही प्रवास करत असला तर अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर इलेक्ट्रिक चार्जिंगची व्यवस्था करण्याचे काम सुरू आहे.
- काही कंपन्यांच्या शोरूममध्येदेखील चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.
- एक्सटर्नल चार्जिंगद्वारेदेखील तुम्हाला चार्जिंग करता येते.