लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : यंदा भारतात सुमारे दहा लाख इलेक्ट्रिक वाहनांची विक्री होण्याची शक्यता असून हा आकडा मागील १५ वर्षांत विकण्यात आलेल्या इलेक्ट्रिक वाहनांच्या एकूण संख्येएवढा आहे, असे इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपन्यांची शिखर संस्था ‘सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चर्स ऑफ इलेक्ट्रिक व्हेइकल्स’ने (एसएमईव्ही) म्हटले आहे.
‘एसएमईव्ही’ने जारी केलेल्या एका निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. संस्थेने म्हटले आहे की, २०२१ मध्ये देशातील इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची विक्री दुपटीने वाढून २,३३,९७१ झाली. २०२० मध्ये १,००,७३६ इलेक्ट्रिक दुचाकी वाहने विकली गेली होती. ‘एसएमईव्ही’चे महासंचालक सोहिंदर गिल यांनी सांगितले की, इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत मागील काही महिने खूपच चांगले राहिले आहेत. इलेक्ट्रिक दुचाकी, तीनचाकी वाहने, इलेक्ट्रिक कार व ई-बस यांची मागील १५ वर्षांतील विक्री दहा लाख इतकी होती.
ही आहेत विक्री वाढण्याची कारणे nगिल यांनी सांगितले की, ई-वाहनांचे अनेक फायदे आहेत. यांच्या किमती पारंपरिक वाहनांच्या तुलनेत अधिक आकर्षक आहेत. त्यांचा खर्च कमी आहे. nत्यांची देखभाल दुरुस्ती यावर होणारा खर्चही कमी आहे. अशा असंख्य कारणांमुळे खरेदीदार ई-वाहनांकडे आकर्षित होताना दिसत आहेत. विशेषत: इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांच्या खरेदीला मोठे बळ ग्राहकांकडून मिळत आहे.
सध्या ई-वाहनांच्या विक्रीला एवढी गती मिळाली आहे की, मागील १५ वर्षांत जेवढी इलेक्ट्रिक वाहने विकली गेली होती, तेवढी इलेक्ट्रिक वाहने एकट्या २०२२ मध्येच विकली जातील, अशी आम्हाला अपेक्षा आहे.