मुंबई : पेट्रोलच्या किंमती पुन्हा एकदा वाढू लागल्या असून याचा भार नागरिकांच्या खिशावर पडू लागला आहे. आज पेट्रोलच्या किंमतीमध्ये 12 पैशांची वाढ झाली. यामुळे मुंबईतील आजचा पेट्रोलचा दर 80.42 रुपये प्रती लिटर झाला आहे. तर डिझेलच्या दरात काहीच बदल झालेला नसून 68.94 वर स्थिर ठेवण्यात आला आहे.
यंदा लोकसभा निवडणुका असल्याने पेट्रोलियम कंपन्यांनी वर्षाच्या सुरूवातीच्या काळात पेट्रोल, डिझेलचे दर वाढविले नव्हते. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर आखाती देशांमध्ये कलह सुरू झाल्याने आणि अमेरिकेने इराणवर बंदी लादल्याने इंधनाचे दर वाढू लागले होते. यंदा 1 ऑक्टोबरला पेट्रोलचा दर 80.21 रुपये होता. तर डिझेल 9 मार्च आणि 2 ऑक्टोबरला 70.76 रुपये प्रती लिटरवर पोहोचले होते.
यानंतर पुन्हा आज पेट्रोलचा दर वाढून या वर्षीच्या उच्चांकी पातळीवर गेला आहे. आज पेट्रोलचा दर 80.42 रुपये झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. एका बॅरलच्या किंमतीमध्ये 0.42 टक्क्यांनी वाढ झाली असून 58 डॉलरवर पोहोचला आहे.