- हेमंत बावकर
गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल (Petrol), डिझेलच्या (Diesel) किंमतींनी कहर मांडला होता. दर दिवसाला 35-35 पैसे असे करत जवळपास 30 ते 35 रुपयांनी इंधन वाढले होते. मोदी सरकारने दिवाळीच्या पूर्वसंध्येला स्वस्ताईचा पाऊस लावत एक्साईज ड्युटीमध्ये पेट्रोलला 5 रुपये आणि डिझेलला 10 रुपयांची कपात केली. परंतू हे कमी केलेले आणि आज सकाळी कमी झालेले दर यात जमीन अस्मानाचा फरक आहे. जाणून घ्या. (Centre cuts excise duty on petrol, diesel)
केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. नवे दर गुरूवार पासून लागू झाले. सरकारच्या या निर्णयामुळे महागाईनं त्रस्त झालेल्या देशवासीयांना काहीशा प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, केंद्रानं पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्यानंतर ग्राहकांना दिलासा देण्यासाठी राज्यांनीही पेट्रोल-डिझेलवरील वॅट कमी करावा असं आवाहन अर्थ मंत्रालयाद्वारे करण्यात आलं आहे.
Petrol-Diesel Price Reduced : खरेतर हे दर पेट्रोल लीटरमागे 5 रुपये आणि डिझेलमागे 10 रुपयांनी कमी व्हायला हवे होते. पेट्रोल, डिझेलच्या दरात तीन नोव्हेंबरला काहीच वाढ झाली नव्हती. यामुळे दोन नोव्हेंबरला कोकणातील पंपांवर पेट्रोलचा दर हा 117.52 रुपये प्रति लीटर होता. तर डिझेलचा दर 106.55 रुपये होता. तो आज पेट्रोल 111.69 रुपये आणि डिझेल 94.38 रुपये प्रति लीटर असा झाला आहे. म्हणजेच पेट्रोल 5.83 रुपयांनी आणि डिझेल 10 रुपये नाही तर 12.17 रुपयांनी कमी झाले आहे. हा दर काही पैशांमध्ये प्रत्येक पेट्रोल पंपाप्रमाणे कमी जास्त असतो. यामुळे सरासरी 5.50 रुपये आणि 12 रुपयांची कपात तुम्हाला तुमच्या नेहमीच्या पेट्रोल पंपांवर दिसणार आहे.
हा घ्या पुरावा....
असे का? मोदी सरकारने केलेल्या घोषणेपेक्षा जास्त दर कपात झाली आहे. केंद्राने जरी राज्यांना व्हॅट कमी करण्याचे आवाहन केलेले असले तरी अनेक राज्यांनी व्हॅट कमी केलेला नाही. तर एक्साईज ड्युटी कमी झाल्याने पेट्रोलचा मूळ दर आणि कमी झालेली एक्साईज ड्युटी लागल्यानंतरच्या किंमतीवर लागणारे कर कमी झाल्याने किंमतीमध्ये हा फरक आला आहे. आता राज्ये व्हॅट कमी करतात का हे पहावे लागणार आहे.