कच्च्या तेलाचे दर वाढले की कलेकलेने दर मध्यरात्री दर वाढविणाऱ्या केंद्र सरकारी कंपन्यांनी तेलाचे दर कमी झाले की मात्र इंधनाचे दर कमी केलेले नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून जनतेला या लाभापासून वंचित ठेवण्यात आलेले आहे. आता तर अनेकांना शेवटचे दर कधी कमी झालेले ते देखील आठवत नाहीय, अशी परिस्थिती असताना पुन्हा एकदा पेट्रोल, डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता असल्याचे वृत्त येत आहे.
यासाठी देखील एक अट ठेवण्यात आली आहे. कच्च्या तेलाच्या किंमती जर बराच काळ कमी स्तरावर राहिल्या तर पेट्रोलियम कंपन्या पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत कपात करण्याबाबत विचार करू शकतात, असे पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस मिनिस्ट्रीचे सचिव पंकज जैन यांनी म्हटले आहे.
कच्च्या तेलाच्या किंमती तीन वर्षांच्या निच्चांकी स्तरावर आल्या आहेत. यामुळे कंपन्यांचा फायदा वाढला आहे. यामुळे महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी इंधनाच्या किंमती कमी केल्या जाऊ शकतात, असा अंदाज बांधला जात आहे. यापूर्वी केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीच्या आधी १४ मार्चला पेट्रोल, डिझेलच्या किंमती दोन रुपये प्रति लीटरने कमी केल्या होत्या.
मंगळवारी ब्रेंट क्रूडची किंमत ७० डॉलर प्रति बॅरलच्याही खाली आली आहे. डिसेंबर २०२१ नंतर पहिल्यांदाच कच्चे तेल एवढ्या कमी किंमतीत मिळत आहे. ग्लोबल इकॉनॉमी सुस्त पडत चालल्याने तेलाच्या मागणीत घट होण्याचा अंदाज आहे. यामुळे कंपन्यांचा फायदा वाढणार आहे. हाच फायदा थेट ग्राहकांना मात्र पोहोचविण्यात येत नाहीय. जेव्हा कच्च्या तेलाचे दर वाढत होते तेव्हा कंपन्यांनी दररोज रात्री २० पैसे, ३० पैसे, ५० पैसे असे करत करत हे दर शंभर रुपयांपार नेऊन ठेवले होते. परंतू हेच कच्चे तेल कमी होत असताना मात्र या कंपन्यांनी दर कमी केले नव्हते.
केंद्र सरकार किती जरी हे आता आपल्या हातात नाही असे सांगून विषय झटकत असले तरी देखील या कंपन्या केंद्र सरकारच्याच म्हणण्यावर चालतात. अनेकदा पेट्रोलियम मंत्र्यांनी देखील दर कपात होणार नाही असे स्पष्ट केले आहे. हे दर कमी होत नसल्याने कोरोनानंतर, रशिया-युक्रेन युद्धानंतर वाढलेली महागाई देखील सामान्यांच्या आटोक्याबाहेर गेलेली आहे.