रशिया युक्रेनमध्ये युद्ध सुरु झाल्यानंतर भारत हा रशियाचा सर्वात मोठा कच्चे तेल खरेदीदार बनला होता. रशियाने कच्चे तेल भारताला खूप स्वस्त दरात दिले होते. परंतू, आता ही परिस्थिती बदलू लागली आहे. कारण रशियाने ट्रान्सपोर्ट चार्ज दुप्पटीहून अधिक आकारण्यास सुरुवात केली आहे. यामुळे आता हे तेल भारतासाठी फायद्याचा सौदा ठरत नाहीय.
भारतीय रिफायनरींना रशियाकडून मिळणाऱ्या कच्च्या तेलातून मिळणारा फायदा कमी झाला आहे. रशियन कंपन्या तेलाच्या वहनासाठी आकारत असलेली रक्कम अपारदर्शक आणि सामान्यपेक्षा खूपच जास्त आहे, असे पीटीआय या वृत्तसंस्थेला सूत्रांनी सांगितले.
रशिया भारतीय रिफायनरींना प्रति बॅरल $60 पेक्षा कमी दराने तेल विकतो. अमेरिका आणि पाश्चात्य देशांनी लादलेली किंमत मर्यादेपेक्षा ही रक्कम कमी आहे. बाल्टिक आणि काळ्या समुद्रातून पश्चिम किनार्यापर्यंत वितरणासाठी रशियाकडून ११ ते १९ डॉलर प्रति बॅरल एवढी आवास्तव किंमत आकारत आहे. जी या अंतरासाठी दुपटीने अधिक आहे.
गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेसह पाश्चात्य देशांनी रशियन तेलावर निर्बंध घातले आणि हळूहळू ते खरेदी करणे बंद केले. यानंतर चीन आणि भारत रशियाचे मोठे गिऱ्हाईक बनले होते. परंतू, आता चीनने देखील आर्थिक हालत आणि ईव्ही गाड्यांना प्राधान्य दिल्याने रशियाकडून तेलाची मागणी कमी केली आहे. याचा परिणाम रशियावर होणार आहे. याचा फायदा भारताने उचलावा असे तज्ञांचे मत आहे.
रशिया-युक्रेन युद्धापूर्वी भारत रशियाकडून फक्त 2 टक्के कच्चे तेल खरेदी करत असे, आता ते 44 टक्के झाले आहे. आता भारताला रशियन तेलावर मिळणाऱ्या सवलतीत मोठी घट झाली आहे. पूर्वी भारताला रशियन तेलावर प्रति बॅरल $३० ची सूट मिळत होती, आता ती सवलत ४ टक्क्यांवर आली आहे.