भारतातील लोकप्रिय महिंद्रा ग्रुपची चर्चा जगभर होत आहे. भारतीय एसयूव्ही बाजारात आपले नाव कमवल्यानंतर आता कंपनी जागतिक बाजारपेठेतही चमकदार कामगिरी करत आहे. महिंद्रा ग्रुपच्या मालकीची कंपनी ऑटोमोबाइल पिनीनफेरिना (Automobili Pininfarina)ची हायपरकार Battista जगातील सर्वात वेगवान स्ट्रीट-लीगल इलेक्ट्रिक कार बनली आहे. या कारने एक नवीन वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला आहे. या इलेक्ट्रिक कारने फक्त 1.79 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तासाचा वेग पकडून सर्वांनाच चकीत केले.
महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्राने आज Twitter वर एक पोस्ट करत सांगितले की, त्यांची कंपनी महिंद्रा ऑटोमोबाइल पिनीनफेरिनाची हायपरकार Battista जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कार बनली आहे. या कारने आपल्याच जुना रेकॉर्ड तोडला. यापूर्वी या कारने 1.86 सेकंदात 0 से 100 किलोमीटर प्रतितासांची स्पीड पकडली होती. तसेच या कारने 193 किलोमीटर प्रतितासांचा वेग पकडण्यासाठी फक्त 4.49 सेकंद घेतले.
पिनीनफेरिनाने 2018 मध्ये पहिल्यांदा आपली इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याची घोषणा केली होती. या कारमध्ये चार इलेक्ट्रिक मोटर्स आहेत, ज्या 1900 एचपी आणि 1,696 फूट एलबीएस टॉर्क जेनरेट करतात. या कारचा कमाल वेग 349 किलोमीटर (217 मैल) प्रतितास आहे. या कारमध्ये 120-kWh क्षमतेची बॅटरी दिली असून, ही सिंगल चार्जमध्ये 482 किलोमीटरची रेंज देते.