या पावसाळ्यामध्ये मुंबईत व शहरांमध्ये अनेक स्कूटर्सना प्लॅस्टिकचे छत वा कव्हर लावण्याची फॅशनच आहील आहे. चिनी कंपन्या आपल्या भारतातील लोकांची गरज ओळखून काहीवेळा कोणत्याही वस्तू ग्राहकांच्या माथ्यावर मारतात, किंवा आपल्या येथील वितरक व व्यापारी आपली डोकॅलिटी वापरून अशा व्सतू खपवण्याचे काम करीत असतात. अगदी ऑनलाईन विक्रीही अशा साधनांची होत असताना दिसते. वस्तू घेताना मुळात त्याचा वैज्ञानिक अंगाने विचार करून ती घेण्याची गरज आहे. ध्या बाजारात आलेले हे रुफ कव्हर उन्हापासून संरक्षण देण्याच्या उद्दिष्टातून बनवलेले दिसते. ते पातळ प्लॅस्टिकपासून तयार केलेले असून लोखंडी पातळ सळ्यांच्या वापरातून त्याला आकार दिला गेला आहे व ते स्कूटरच्या पुढच्या बाजूने व मागच्या बाजूने प्लॅस्टिकच्या दोऱ्यांनी बांधले गेलेले आहे. चालकाला दिसण्यासाठी पुढील भाग प्लॅस्टिकचा फोल्डिंग पद्धतीने वापर करून तयार केला आहे. सर्वसाधारण बुद्धीमत्तेचा वापर करून तयार केलेले हे छत खरोखरच काही कामाचे आहे, असे भारतातील पावसावरून अजिबात म्हणता येणार नाही. मुळात ते कव्हर पावसासाठी नाही. पण उन्हासाठी म्हणून म्हणाल तर ते स्कूटरवर कशासाठी, कारण त्यामुळे स्कूटर वा दुचाकी यांच्या एरोडायनॅमिक रचनेला अडथळा आणणारे आहे, तसेच त्यामुळे दुचाकी चालवताना विशिष्ट वेगाच्या वर ती नेल्यास दुचाकीच्या बॅलन्सला, म्हणजे समतोलाला घातक आहे. त्यामुळे तोल जाऊ शकतो. शहरातील वाहतुकीची वर्दळ पाहाता, स्कूटर्स व मोटारसायकली ज्या पद्धतीने रस्त्यातून मार्गक्रमण करीत असतात, त्यात या प्रकारच्या कव्हरमुळे उन्हाचा त्रास सोडा, त्या स्कूटरला सायकलपेक्षाही कमी वेगात नेताना, बाजूच्या दुचाकीस्वाराला वा मोटारीलाही धक्का लागत असतो म्हणून सांभाळावे लागते. जोरदार वाऱ्यामध्ये त्या कव्हरचे हेलकावणे म्हणजे एखाद्या जहाजाच्या शिडासारखे असते. वास्तविक विविध प्रकारच्या अॅक्सेसरीज बाजारात सादर करताना आरटीओसारख्या संस्थ्यांचा हस्तक्षेप असावा, असे आता वाटू लागले आहे. अशा प्रकारच्या वस्तूंमुळे अन्य लोकांना त्रास होऊ शकतो, त्या वस्तू वापरणाऱ्यांनाही त्याचा त्रास व अडचण होऊ शकते, हे लक्षात घेून त्या त्या वस्तू बाजारात विकण्यासाठी प्रतिबंध घालायचा की नाही, हे ठरवण्याची गरज आहे. अर्थात ज्यांना आपले पैसे अशा वैविध्यपूर्ण वस्तुंवर खर्चच करायचे असतात, त्यांच्याबाबत काहीच बोलता येत नाही. पण अशा प्रकारच्या साधनांमुळे कोणत्या तरी उत्पादकांचे खिसे भरले जात असतात, कालांतराने लोकांना त्याचा त्रास वाटू लागतो, ते त्रासदायक साधन असल्याचे पटू लागते व त्याचा वापर लोक बंद करतात. मात्र तोपर्यंतच्या काळामध्ये अशा अजब साधनांचा उत्पादक, व्यापारी, भरपूर कमाई करून बसलेला असतो.
उन्हापासून संरक्षण करणारे प्लॅस्टिक कव्हर पावसात काय कामाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 12:07 PM