नवी दिल्ली : एक काळ असा होता की कारमध्ये काहीच सेफ्टी फिचर्स दिले जात नव्हते. नंतर कालांतराने काही सेफ्टी फिचर दिले जाऊ लागले. आता तर भारंभार सेफ्टी फिचर्ससोबत कारही हायटेक झाल्या आहेत. आधी साधे डोअर लॉक असायचे आता स्पीड सेन्सिंग, चाईल्ड लॉक आणि सेंट्रल लॉकिंगसारख्या सुविधा देण्यात येतात. यामुळे कार चोरी करण्याच्या प्रमाणातही कमी आली आहे. मात्र, तरीही कार चोरी होण्याची भीती अनेकांना सतावत असते.
अनेकांचे पार्किंग रस्त्याच्या कडेला, दोन चार बिल्डिंग सोडून असते. यामुळे कार चोरीला जाण्याची शक्यता असते. कार हायटेक झाल्या तशा चोरही हायटेक झाले आहेत. चोरी झालेली कार शोधणे आणि ती पुन्हा मिळविणे मोठे कठीण काम असते. अशावेळी जीपीएस डिव्हाईसेस तुम्हाला ती सुरक्षा पुरवू शकतात. समजा कार चोरीला गेलीच तर तुम्हाला ती कुठे आहे याचे लोकेशन पाहता येते आणि चोरापर्यंत पोहोचता येते.
वायर्ड जीपीएस : जीपीएस म्हणजेच (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम) एक असे डिव्हाईस असते जे सतत त्याची पोझिशन मालकाला पाठवत असते. या वायर्ड जीपीएसचा वापर साधारणपणे मोठ्या वाहनांमध्ये केला जातो. हे डिव्हाईस वाहनाची बॅटरी वापरून सॅटेलाईटला सिग्नल पाठविते. हे डिव्हाईस वाहनाच्या खालच्या बाजुला लावले जाते. डिव्हाईसने पाठविलेले सिग्नल हे मोबाईलवर पाहता येतात. कोणत्याही वातावरणात हे डिव्हाईस सिग्नल पाठवतच राहते. जर तुमच्याकडे ट्रक, बस आदी वाहने असतील आणि ती ट्रॅक करावी लागत असतील तर तुम्हाला या प्रकारचे जीपीएस उपयोगी पडतात.
वायरलेस जीपीएस: वायरलेस जीपीएस हे त्यातील रिचार्जेबल बॅटरीवर चालते. हे जीपीएस तुम्ही तुमच्या कारमध्ये ठेवू शकता. हे डिव्हाईस वायर्ड जीपीएसपेक्षा कमी क्षमतेचे असते. याचा वापर छोट्या वाहनांमध्ये केला जातो. हे डिव्हाईस काही काळाने चार्ज करावे लागते. महत्वाचे म्हणजे हे डिव्हाईस फिक्स करायचे नसल्याने चोरकप्प्यात किंवा चोराला सापडणार नाही अशा जागी ते लपविता येते. तसेच हे जीपीएस तुम्ही दुसऱ्या वाहनांसाठीदेखील वापरू शकता. या जीपीएसचा आकार छोटा आणि पोर्टेबल असल्याने वापरण्यास सोपे जाते.