रिलायन्स जिओने ऑटोमोबाईल क्षेत्रात चंचूप्रवेश केला आहे. जिओने एक खास डिव्हाईस लाँच केले असून कोणत्याही वायरच्या छेडछाड़ीशिवाय हे डिव्हाईस तुम्हाला तुमची कार स्मार्ट बनविता येणार आहे. यासाठी या डिव्हाईसमध्ये ई-सिम देण्यात आलेले आहे, जे तुमच्या मोबाईल मधील सिमच्या रिचार्ज प्लॅनवरच चालणार आहे. शिवाय तुमच्या कारची सुरक्षाही करणार आहे.
हे ओबीडी डिव्हाईस आहे. याचे नाव जिओ मोटिव्ह असे ठेवण्यात आले आहे. हे खरेदी केल्यानंतर एक वर्षभर सबस्क्रिप्शन मोफत असेल नंतर ५९९ रुपये मोजावे लागणार आहेत. कारच्या ओबीडी पोर्टला हे डिव्हाईस कनेक्ट करावे लागणार आहे. या डिव्हाईसमध्ये ४जी जीपीएस ट्रॅकिंग आहे. याद्वारे तुम्ही कारचे लोकेशन लाईव्ह पाहू शकणार आहात.
याचबरोबर जेव्हा तुम्ही चालक नसाल किंवा त्या कारमधून जात नसाल तेव्हा तुम्हाला तुमची कार पार्किंगमधून निघाली आणि पुन्हा आल्याचा अलर्ट दिला जाणार आहे. हे डिव्हाईस कारची हेल्थही सांगणार आहे. शिवाय डायग्नोस्टिक कोडही मिळणार आहे. चालक कशी गाडी चालवत होता, कारचा परफॉर्मन्स आदी गोष्टी हे डिव्हाईस सांगणार आहे. थोडक्यात जी फिचर्स तुम्हाला १०-१५ लाखांच्या वरच्या कारमध्ये मिळतात ती तुम्हाला ४९९९ रुपयांत मिळणार आहेत.
कार चोरी झाली तर त्याचाही अलर्ट मिळणार आहे. तसेच एखाद्या ठराविक काळात जर तुम्ही कार चालूच करत नसाल आणि ती जर चालू झाली तरी त्याचा अलर्ट तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे समजा तुम्ही रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत कधीही कुठेही जात नसाल तर त्या काळात कार चालू झाली तर तुम्हाला अलर्ट दिला जाणार आहे.