- हेमंत बावकर
भारतीय ग्राहकांनी सध्या डिझेल वाहनांकडे पाठ फिरविली आहे. शहरातील वाहतूक कोंडी, अरुंद रस्त्यांवरून रोजच्या वापरासाठी छोट्या कारना पसंती जास्त आहे. रेनॉल्टने तीन वर्षांपूर्वी क्विड ही छोटी कार लाँच केली होती. या कारला मोठा प्रतिसादही मिळाला होता. मारुतीच्या अल्टोला या कारने टक्कर दिली होती. यानंतर काही महिन्यांपूर्वीच रेनॉल्टने क्विडची फेसलिफ्ट नव्या अंदाजात लाँच केली आहे.
तसे पाहता क्विड ही एखाद्या एसयुव्हीचे छोटे रुपच. परंतू या कारमध्ये लेग स्पेस आणि लगेज स्पेसही कमालीची मोठी आहे. ही बाब अन्य़ कंपन्यांच्या हॅचबॅक कारनाही जमलेली नाही. सहा फुट उंचीचा व्यक्तीही या कारमध्ये आरामात बसू शकतो. आकर्षक बंपर, एलईडी हेडलाईट यामुळे ही कार चटकन नजरेत भरणारी आहे. अलॉय व्हील्स, आरामदायक सीट, दोन एअरबॅग, इन्फोटेन्मेंट टच स्क्रीन यामुळे ही कार पाच लाखांमध्ये प्रिमियम कारचा फील देणारी आहे.
लोकमतच्या टीमकडे ही कार रिव्ह्यूसाठी आली होती. जवळपास 280 किमींचे अंतर चालवून या कारची चाचणी घेण्यात आली. खड्ड्यांचे रस्ते, पिकअप, मायलेज, रात्रीच्या वेळी ड्रायव्हिंग आदी गोष्टी पडताळण्यात आल्या. रात्रीच्यावेळी कार चालविताना हेडलाईटची उंची सेट करण्यासाठी अॅक्सेलिरेटरच्या थोडे वर पायात नॉब देण्यात आला आहे. डॅशबोर्डवर कोपऱ्यात दोन स्पीकर देण्यात आले आहेत. साऊंड सिस्टिमचा आवाज एवढा चांगला नाही. 20.32 सेमींची इन्फोटेन्मेंट टच स्क्रीन देण्यात आली आहे. यामध्ये अँड्रॉईड ऑटो आणि अॅपल कारप्ले देण्यात आला आहे. सुरक्षेसाठी दोन एअरबॅग, पार्किंग कॅमेरा, एलईडी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एबीएस सारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. या सुविधा या छोट्या कारच्या तुलनेत मोठ्याच आहेत. पुढील काचा खाली-वर करण्यासाठी टचस्क्रीन आणि एसीच्या बटनांच्या मध्ये दोन बटने देण्यात आली आहेत. बटनांची ही रचना इतर कारपेक्षा वेगळीच आहे.
घाटामध्ये कारने चांगला पिकअप घेतला. पेट्रोल 1 लीटर टर्बो इंजिन असूनही गिअर सारखे बदलावे लागले नाहीत. वळणावर कारने तोल जाऊ न देता चांगला कंट्रोल केला. खड्ड्यांमध्ये कारने चांगला परफॉर्म केला. कारमध्ये दचके जाणवले नाहीत. मायलेजच्या बाबतीत काहीसे निराश केले. मुंबई-पुणे प्रवासादरम्यान कारने 16 किमी प्रती लीटर एसी चालू नसताना मायलेज दिले. कारला 28 लीटरची टाकी देण्यात आली आहे. कंपनीने 23.02 किमीचे मायलेज सांगितले आहे. मात्र, 80 किमीच्या वेगाने जाऊनही कारने काहीसे निराश केले.
Renault Captur : खड्डेमय रस्त्यांचा त्रास की आरामदायी प्रवास? जाणून घ्या कसा आहे नवा पर्याय
रेनॉल्ट क्विड किंमत 2.83 लाखांपासून सुरू; पहा स्पेसिफिकेशन
क्वीडची जमेची बाजू म्हणजे तिचा देखणेपणा. पाठीमागील सीटवर आर्मरेस्ट, आरामदायक सीट, लेग स्पेस आणि लगेज स्पेस ही या कारची वैशिष्ट्ये आहेत. य़ा छोट्या कारच्या रेंजमध्ये ही सुविधा पहिल्यांदाच देण्यात आली आहे. इंजिनचा आवाज कमी आहेच, शिवाय रस्त्यावरील आवाजही आतमध्ये ऐकायला येत नाही. मात्र, कार पुढे, मागे करतेवेळी पिकअप घेताना पुढील चाकांमध्ये व्हायब्रेशन होते. थडथड असा आवाज करत कारमध्येही ही व्हायब्रेशन जाणवतात.
क्विड दोन इंजिनप्रकारात येते. 1.0 लीटर आणि 0.8 लीटरची दोन पेट्रोल इंजिने देण्यात आलेली आहेत. पिकअपचे शौकीन असाल तर 1.0 लीटर इंजिनाचा पर्याय निवडणे योग्य आहे. यामध्ये अॅटोमॅटीकचाही पर्याय आहे. एकंदरीत स्टाईलिशही हवी आणि छोटी, शहरातील वाहतूक कोंडीतही चालविण्यासाठी योग्य अशी ही कार आहे.