भारतात महिंद्रानंतर टाटाने इलेक्ट्रीक वाहनांच्या दुनियेत पाऊल टाकण्याचे धाडस केले आणि यशस्वी झाली. आता हे पाहून अन्य कंपन्यादेखील आपली ईलेक्ट्रीक वाहने भारतीय बाजारात आणण्याच्या तयारीला लागली आहेत. महिंद्रा देखील आता नेक्स़ॉनला टक्कर देण्यासाठी ईव्ही आणणार आहे. परंतू ही वाहने महाग आहेत. यातच अल्टोएवढ्याच छोट्या आकारात एसयुव्हीचा फिल देणारी क्विड इलेक्ट्रीक अवतारात भारतात येण्याची चर्चा सुरु झाल्याने खळबळ उडाली आहे.
रेऩॉ कंपनी लवकरच भारतात क्विड इलेक्ट्रीक कार (Renault Kwid Electric) लाँच करण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे जागतिक बाजारात या क्विडने गेल्याच वर्षी पाऊल ठेवले आहे. डेसिया स्पिंग ईव्ही या नावाने क्विड युरोपीय रस्त्यांवर धावत आहे. काही देशांत ही कार Kwid E-Tech नावाने देखील लाँच झालेली आहे. चीनमध्ये तर ही कार City K-ZE नावाने विकली जाते. आता नुकतेच या कारला ब्राझीलमध्ये टेस्टिंगवेळी पाहण्यात आले आहे.
गेल्या वर्षी लाँच झाल्यानंतर क्विड ईव्हीची युरोपियन एनकॅप सेफ्टी चाचणी घेण्यात आली, तिथे तिला एक स्टार मिळाला आहे. आता या कारच्या भारतीय अवतारात काय काय मिळेल याची माहिती नाहीय. तसेच रेनॉने देखील याची अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, पेट्रोल, डिझेलच्या किंमती पाहता कंपनी ही पेट्रोलवरील कार ईलेक्ट्रीकमध्ये आणण्याची तयारी लवकरच सुरु करू शकते.
रेंज किती? रेऩॉ क्विड इलेक्ट्रीकची रेंज 290 किलोमीटर असू शकते. तसेच यामध्ये 26.8 kWh चे बॅटरी पॅक असेल. टॉप स्पीड 125 kmph असेल. डीसी फास्ट चार्जरद्वारे ही कार अर्ध्या तासात ८० टक्के चार्ज केली जाऊ शकते. तसेच या कारची किंमतही १० लाखांपेक्षा कमी असू शकते. हा टाटासाठी धक्का असणार आहे. कारण सध्या भारतात टाटाची टिगॉर इव्ही स्वस्त कार आहे.