मुंबई: टाटा मोटर्सनं ईलेक्ट्रिक क्षेत्रात मोठी आघाडी घेतली आहे. देशातील एकूण ईलेक्ट्रिक कारच्या विक्रीतील टाटा मोटर्सचा वाटा मोठा आहे. टाटा नेक्सॉन ईव्हीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एसयूव्ही कॅटेगरीत धुमाकूळ घालणाऱ्या नेक्सॉनला टक्कर देण्यासाठी इतर कंपन्यांचे प्रयत्न सुरू आहेत. एसयूव्ही इलेक्ट्रिक प्रकारात विविध कंपन्या नशीब आजमावत आहेत. मात्र नेक्सॉनचं वर्चस्व कायम आहे.
टाटा नेक्सॉनपेक्षा उत्तम कार इतर कंपन्यांना अद्याप तरी बाजारात आणता आलेली नाही. नेक्सॉनला टक्कर देण्यासाठी आता तीन कंपन्या एकत्र आल्या आहेत. रेनॉ-निसान-मित्सुबिशी या तीन कंपन्यांनी हातमिळवणी केली आहे. या तीन कंपन्या मिळून आता इलेक्ट्रिक एसयूव्ही प्रकारात नवी कार आणतील. टाटा नेक्सॉनला कुरघोडी करण्याचा तीन कंपन्यांचा प्रयत्न आहे.
रेनॉ-निसान-मित्सुबिशी मिळून CMF-BEV प्लॅटफॉर्मवर आधारित कार तयार करणार आहेत. हा प्लॅटफॉर्म युरोपसाठी डिझाईन करण्यात आला आहे. मात्र भारतात इलेक्ट्रिक कार्सची क्रेझ वाढत असल्यानं आता तीन कंपन्यांनी भारताकडे लक्ष केंद्रित केलं आहे. टाटा कार्सच्या वर्चस्वाला शह देण्याची आणि भारतीय बाजारपेठेत पाय रोवण्याची तयारी तीन कंपन्यांकडून सुरू आहे.
टाटा नेक्सॉन ईव्हीमध्ये परमनंट मॅगनेट एसी देण्यात आली आहे. कारमध्ये लिथियम आयर्न बॅटरी दिली गेली आहे. पाणी आणि धुळीचा बॅटरीवर कोणताही परिणाम होत नाही. नेक्सॉन ईव्हीमध्ये ३०.२ kWh बॅटरी देण्यात आली आहे. ही कार एका चार्जमध्ये ३१२ किलोमीटरपर्यंत जाते. ० ते १०० किमी प्रतितास वेग गाठण्यासाठी कारला ९.९ सेकंद लागतात.